पानगाव तलावात विवाहितेचा मृतदेह; आत्महत्येचा प्राथमिक अंदाज

21 Feb 2026 20:41:19
गोंदिया,
Pangaon lake suicide, सालेकसा तालुक्यातील पानगाव येथे एका ३८ वर्षीय विवाहितेचा मृतदेह गावातील तलावात आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. शनिवार २१ फेब्रुवारी रोजी सकाळी आठच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. संबंधित महिलेने आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
 

Pangaon lake suicide, 
मिराबाई माखनलाल दशहरे (३८) या मूळच्या मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील चिखली येथील रहिवासी असून त्यांचे माहेर पानगाव येथे आहे. १८ फेब्रुवारी रोजी सकाळी अकराच्या सुमारास त्या पती माखनलाल दशहरे आणि मुलगा रोहित यांच्यासह माहेरी आल्या होत्या. त्यांना माहेरी सोडून पती व मुलगा परत गावी गेले. मात्र, त्याच दिवशी सायंकाळी चार वाजल्यापासून त्या वडिलांच्या घरातून बेपत्ता झाल्या.
कुटुंबीयांनी शोधाशोध करूनही काहीच माहिती न मिळाल्याने त्यांच्या वडिलांनी रमेश पगरवार यांनी १९ फेब्रुवारी रोजी सालेकसा पोलिस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती.
दरम्यान, शनिवारी सकाळी गावातील काही नागरिकांनी तलावात एका महिलेचा मृतदेह तरंगत असल्याची माहिती दिली. ही बातमी कळताच रमेश पगरवार यांनी कुटुंबीयांसह तलावाकडे धाव घेतली. मृतदेह पाहताच तो मिराबाई यांचाच असल्याचे त्यांनी ओळखले.
याबाबत पानगावचे माजी सरपंच चेतलाल हटिले यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत गावकऱ्यांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला. प्राथमिक तपासात तलावात उडी घेऊन आत्महत्या केल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास ठाणेदार भूषण बुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
Powered By Sangraha 9.0