बॉलिवूड सोडण्याचा कधीच विचार नव्हता

21 Feb 2026 15:18:19
मुंबई
Priyanka Chopra प्रियंका चोप्रा ही केवळ बॉलिवूडची नव्हे तर हॉलिवूडमध्येही ठसा उमटवणारी जागतिक दर्जाची अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. हिंदी चित्रपटसृष्टीत कारकिर्दीच्या शिखरावर असताना तिने अमेरिकेकडे वळण्याचा घेतलेला निर्णय अनेकांसाठी आश्चर्यकारक ठरला होता. मात्र आता तिने बॉलिवूड ते हॉलिवूड या प्रवासामागील कारणांबाबत धक्कादायक खुलासा केला आहे. “मला कधीच बॉलिवूड सोडायचं नव्हतं, पण मला बाहेर संधी शोधण्यासाठी ढकलण्यात आलं,” असे स्पष्ट वक्तव्य तिने एका मुलाखतीत केले.
 

Priyanka Chopra, Bollywood to Hollywood 
फर्स्टपोस्टला दिलेल्या मुलाखतीत प्रियंकाने आपल्या करिअरच्या निर्णायक टप्प्यांबद्दल मनमोकळेपणाने भाष्य केले. हिंदी चित्रपटांत यशस्वी वाटचाल सुरू असतानाच तिला स्वतःला मर्यादित वाटू लागल्याचे ती म्हणाली. “मला पुढे जायचं होतं, प्रगती करायची होती. एक कलाकार म्हणून रोमांचक आणि आव्हानात्मक संधींची मला गरज होती. त्या शोधण्याचा दबाव माझ्यावर होता,” असे ती म्हणाली. अमेरिकेत काम करण्यास सुरुवात केल्यानंतर जवळपास बारा वर्षांनंतर आज स्वतःला अधिक सक्षमपणे काम निवडता येत असल्याची भावना तिने व्यक्त केली. “ही प्रक्रिया सोपी नव्हती,” असेही ती नमूद करते.
 
 
२०१२ साली Priyanka Chopra  संगीत क्षेत्रातून आंतरराष्ट्रीय पातळीवर पाऊल टाकल्यानंतर प्रियांकाने हॉलिवूडमध्ये अभिनयाच्या संधी शोधण्यास सुरुवात केली. Quantico या अमेरिकन मालिकेत प्रमुख भूमिकेत झळकत तिने पाश्चिमात्य प्रेक्षकांमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली. त्यानंतर Baywatch आणि The Matrix Resurrections यांसारख्या चित्रपटांतून तिने आपली उपस्थिती नोंदवली.दोन्ही इंडस्ट्रींमध्ये काम करण्याच्या अनुभवाबाबत बोलताना प्रियांका म्हणाली की, भारतीय चित्रपटांविषयी तिच्या मनात विशेष प्रेम आहे. “मला दोघांपैकी एक निवडण्याची गरज नाही. मी कधीच तसं केलं नाही. मी दोन्ही जगात आहे आणि दोन्ही ठिकाणी काम करण्याचा आनंद घेते,” असे ती म्हणाली. दोन्ही ठिकाणची संस्कृती, काम करण्याची पद्धत आणि अपेक्षा वेगवेगळ्या असल्या तरी आता स्वतःचा मेंदू त्या दोन्ही पद्धतींशी जुळवून घेत असल्याचे ती सांगते.दरम्यान, प्रियांकाच्या आगामी प्रकल्पांकडेही चाहत्यांचे लक्ष लागले आहे. ती लवकरच The Bluff या फ्रँक ई. फ्लॉवर्स दिग्दर्शित पायरेट-आधारित साहसी चित्रपटात झळकणार आहे. हा चित्रपट २५ फेब्रुवारी रोजी Amazon Prime Video या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. याशिवाय S. S. Rajamouli दिग्दर्शित ‘वाराणसी’ या चित्रपटातून ती आठ वर्षांनंतर भारतीय सिनेसृष्टीत पुनरागमन करणार आहे. या चित्रपटात Mahesh Babu आणि Prithviraj Sukumaran यांच्याही भूमिका आहेत. हा बहुचर्चित चित्रपट एप्रिल २०२७ मध्ये प्रदर्शित होणार असल्याचे सांगितले जाते.
 
 
 
जागतिक पातळीवर नाव कमावतानाही आपल्या मुळांशी नाळ जपणारी अभिनेत्री म्हणून प्रियांका चोप्राकडे पाहिले जाते. बॉलिवूड सोडण्याचा निर्णय स्वतःचा नसल्याचा तिचा खुलासा इंडस्ट्रीत चर्चेचा विषय ठरला असून, तिच्या या प्रवासाने अनेक नवोदित कलाकारांना नवे धैर्य दिल्याचे मानले जात आहे.
Powered By Sangraha 9.0