ऑनलाईन याचिकेने ओलांडला 20 हजार स्वाक्षर्‍यांचा टप्पा

21 Feb 2026 20:39:14
चंद्रपूर,
Save Lohardongri campaign, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प ते उमरेड-कर्‍हांडला तसेच नवेगाव-नागझिरा या अतिशय संवेदनशील अशा वाघांच्या भ्रमणमार्गातील प्रस्तावित ‘लोहारडोंगरी’ लोहखनिज खाण रद्द करण्यासाठी सुरू असलेल्या ‘सेव्ह लोहारडोंगरी, सेव्ह ताडोबा’ या ऑनलाईन मोहिमेला अभूतपूर्व यश मिळत आहे. अवघ्या काही दिवसांत या याचिकेने 20 हजार स्वाक्षर्‍यांचा आकडा पार केला असून, हा प्रकल्प रद्द करण्यासाठी आता जनचळवळ अधिक तीव्र झाली आहे.
 

Save Lohardongri campaign,  
याबाबत माहिती देताना राज्य वन्यजीव मंडळाचे माजी सदस्य तथा इको प्रोचे अध्यक्ष बंडू धोतरे म्हणाले, ब्रह्मपुरी वनविभाग हा 60 पेक्षा जास्त वाघांच्या हक्काचा अधिवास असून, खाणकामामुळे हा अधिवास नष्ट होईल. या प्रकल्पासाठी 35.94 हेक्टरमधील तब्बल 18 हजार 24 झाडे कापली जाणार आहेत. ज्यामुळे पर्यावरणाचे भरून न निघणारे नुकसान होईल. जिल्ह्यात गेल्या 5 वर्षांत वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात 200 जणांचा बळी गेला आहे. 2025 वर्षात 47 ग्रामस्थांचा मृत्यू झालेला आहे. खाणीतील ‘ब्लास्टिंग’ आणि जंगलतोडीमुळे वाघ मानवी वस्तीत शिरतील, ज्यामुळे ग्रामीण भागात भीतीचे सावट पसरणार आहे. या प्रकल्पामुळे 120 जणांना रोजगार मिळेल असा दावा केला जात असला तरी, प्रत्यक्षात केवळ 32 जणांनाच कायमस्वरूपी रोजगार मिळणार आहे.
20 हजार स्वाक्षर्‍यांचा टप्पा ही तर केवळ सुरुवात आहे. हा लढा अधिक व्यापक करण्यासाठी ज्यांनी अजूनही या ऑनलाईन याचिकेवर स्वाक्षरी केली नाही, त्यांनी त्वरित आपली स्वाक्षरी नोंदवून जंगल-निसर्ग रक्षणात सहभाग घ्यावा. आपल्या भागातील समस्या आणि खाणीमुळे होणार्‍या धोक्यांबाबतचे ‘व्हिडिओ’ समाज माध्यमावर शेअर करून ही मोहीम प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचवावी. जिल्ह्यातील प्रत्येक गावाने आणि शहराने या विनाशाविरुद्ध आपला आवाज बुलंद करावा, असे आवाहन इको-प्रोतर्फे करण्यात आले आहे.
मानव-वन्यजीव संघर्ष वाढेलः
हा प्रकल्प केवळ चंद्रपूरची समस्या नसून, संपूर्ण व्याघ्र संवर्धनावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा आहे. कालवे, सिंचन प्रकल्प आणि रस्ते रुंदीकरणामुळे आधीच जंगलाचे तुकडे झाले असताना, या खाणीला परवानगी देणे म्हणजे निसर्गाची थट्टा आहे. निसर्गसंपन्न लोहारडोंगरी परिसराच्या सभोवताल असलेल्या गावांत आता मानव-वन्यजीव संघर्ष अधिक तीव्र होणार आणि हवा-पाणीचे प्रदूषण तसेच येथील कृषी क्षेत्र प्रभावित होण्याची शक्यता आहे, अशी भिती धोतरे यांनी व्यक्त केली.
Powered By Sangraha 9.0