नागपूर,
Pensioners Association जनरल इन्शुरन्स पेन्शनर्स असोसिएशन, पश्चिम क्षेत्र, नागपूर शाखेची १७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा बजाज नगर येथील सारस्वत सभागृहात उत्साहात पार पडली. सभेला प्रमुख अतिथी म्हणून न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीचे क्षेत्रीय प्रबंधक आर. सुरेशबाबू, नॅशनल इन्शुरन्सच्या क्षेत्रीय प्रबंधक राधा कठाळे तसेच ओरिएंटल इन्शुरन्सचे क्षेत्रीय प्रबंधक विजय सावतकर उपस्थित होते. जनरल इन्शुरन्स एम्प्लॉयी युनियन, पश्चिम क्षेत्राचे अध्यक्ष प्रदीप धरमठोक यांनी प्रमुख भाषणात सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी लढा देऊन मिळवलेल्या सुविधांचा आढावा घेतला. तसेच केंद्र सरकारच्या धर्तीवर पेन्शन व इतर लाभ मिळावेत यासाठी संघटितपणे संघर्ष करण्याचे आवाहन केले.

वयाची ७५ वर्षे पूर्ण केलेल्या सदस्यांचा अतिथींच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. द्वितीय सत्रात सचिव अविनाश पुलतामकर यांनी संघटनेच्या सध्यस्थितीची माहिती सादर केली. राष्ट्रीय उपाध्यक्ष अरुण कुलकर्णी यांनी केंद्र सरकार व जनरल इन्शुरन्स पब्लिक सेक्टर असोसिएशन यांच्यात झालेल्या बैठकीबाबत माहिती दिली. हेल्थ इन्शुरन्स थर्ड पार्टी एजन्सीचे राहुल वाहूरवाघ यांनी मेडिक्लेम दाव्यांबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन आनंद तेलंग यांनी केले, तर आभार प्रदर्शन एस. बी. मिश्रा यांनी केले. Pensioners Association कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी गुरु हेमराजानी, मधुसूदन शेंबेकर, चंदू देशपांडे, के. के. जोशी, अनिल घोडमारे, विवेक भालेकर, जवखेडकर व नाईक यांनी विशेष परिश्रम घेतले.
सौजन्य: मधुसूदन शेंबेकर, संपर्क मित्र