एआय, क्रीडा आणि अवयवदानाचा उल्लेख; ‘मन की बात’मधून पीएम मोदींचा प्रेरणादायी संदेश

22 Feb 2026 11:47:54
नवी दिल्ली,  
pm-modi-mann-ki-baat पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ‘मन की बात’ या रेडिओ कार्यक्रमाच्या १३१ व्या भागातून देशवासीयांशी संवाद साधला. देशाच्या यशोगाथा आणि सामान्य नागरिकांच्या प्रेरणादायी कार्यांचा गौरव करण्यासाठी हा कार्यक्रम प्रभावी माध्यम ठरत असल्याचे त्यांनी सांगितले. दिल्लीतील भारत मंडपम येथे झालेल्या ‘ग्लोबल एआय इम्पॅक्ट समिट’चा उल्लेख करत त्यांनी भारताने कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात गाठलेली प्रगती अधोरेखित केली. या परिषदेसाठी विविध देशांतील नेते, उद्योग क्षेत्रातील मान्यवर आणि स्टार्ट-अप क्षेत्रातील प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. भविष्यात एआयचा उपयोग कसा होईल याचा दिशादर्शक क्षण या परिषदेमुळे निर्माण झाल्याचे त्यांनी नमूद केले.
 
pm-modi-mann-ki-baat
 
परिषदेदरम्यान जागतिक नेत्यांना भेटण्याची आणि काही अभिनव उपक्रम दाखवण्याची संधी मिळाल्याचे सांगत त्यांनी दोन विशेष उदाहरणांचा उल्लेख केला. एका प्रदर्शनात दुग्धव्यवसायात एआयचा वापर कसा होतो, पशुधनाचे आरोग्य व व्यवस्थापन २४ तास कसे पाहिले जाते याचे सादरीकरण करण्यात आले होते. दुसऱ्या उदाहरणात भारतीय संस्कृती आणि परंपरेशी संबंधित प्रकल्प होता. प्राचीन ग्रंथ आणि हस्तलिखिते आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने जतन करून ती नव्या पिढीसाठी सुलभ कशी केली जात आहेत, हे पाहून परदेशी पाहुणे प्रभावित झाल्याचे त्यांनी सांगितले. pm-modi-mann-ki-baat सुश्रुत संहितेच्या हस्तलिखितांचे डिजिटल पुनरुज्जीवन आणि त्यांचे मशीन-वाचनीय रूपांतरण हा त्यातील महत्त्वाचा भाग होता.
खेळांच्या माध्यमातून एकात्मता वाढते, असे सांगत त्यांनी टी-२० विश्वचषकातील भारतीय वंशाच्या खेळाडूंचा उल्लेख केला. वेगवेगळ्या देशांसाठी खेळणारे भारतीय मूळ असलेले खेळाडू पाहून देशवासीयांना अभिमान वाटतो, असे ते म्हणाले. pm-modi-mann-ki-baat कार्यक्रमात त्यांनी केरळमधील अलिन शेरीन अब्राहम या अवघ्या दहा महिन्यांच्या बालिकेच्या निधनाचा उल्लेख करत तिच्या पालकांनी घेतलेल्या अवयवदानाच्या निर्णयाचे कौतुक केले. दु:खाच्या क्षणीही इतरांना जीवनदान देण्याचा घेतलेला हा निर्णय समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले.
सायबर फसवणुकीबाबत सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करत त्यांनी नागरिकांना ओटीपी, आधार क्रमांक किंवा बँक खात्याची माहिती कोणालाही देऊ नये, असे स्पष्ट केले. संशयास्पद फोन किंवा संदेशांपासून दूर राहावे आणि नियमितपणे पासवर्ड बदलण्याची सवय लावावी, असेही त्यांनी सांगितले. जागरूकता आणि सतर्कता हाच डिजिटल सुरक्षेचा मुख्य आधार असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
Powered By Sangraha 9.0