वाशीम,
amalkishore Maharaj भारतीय संस्कृती जगात पुज्यनिय व महान आहे. आज भारतीय संस्कृती व सनातन धर्मावर आघात करण्याचे षडयंत्र रचण्यात येत आहे. त्यामुळे प्रत्येकाने सावध होवून सनातन धर्म व आपल्या संस्कृतीचे रक्षण करणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन आचार्य दिव्य शक्ती आखाडा सहारनपूर उत्तर प्रदेश येथील कमलकिशोर महाराज यांनी केले.
स्थानिक प्रजापिता ब्रम्हकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या वतीने गितेच्या ज्ञानाव्दारे सनातन संस्कृतीचे रक्षण या विषयावर आयोजित व्याख्यानात त्यांनी वरील विचार मांडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजयोगीनी रूख्मीनी दिदी होत्या. वक्ते म्हणून मंचावर संयोजक ब्रम्हकुमार नारायणभाई, नागासाधू श्यामसुंदर भारती, हभप श्रीकृष्ण पाटील, नगराध्यक्ष अनिल केंदळे, ब्रम्हकुमारी पार्वती दिदी, ब्रम्हकुमारी भागीरथी दिदी, हभप सागर महाराज पारीसकर व आदी उपस्थित होते. यावेळी कमलकिशोर महाराज यांनी विविध विषयावर मार्मिक विश्लेषण करून प्रबोधन केले. महंत श्यामसुंदर भारती यांनी मुलींना दंड बैठका, कराटे प्रशिक्षण देण्याचे आवाहन केले. संस्कृतीच्या रक्षणाकरीता व गितेच्या तत्वानुसार हिंदुधर्मवासीयांनी संघटीत होवून कार्य करणे जरूरी असल्याचे सांगीतले. हभप श्रीकृष्ण पाटील यांनी भगवत गितेचे महत्व विषद केले. राजयोगीनी रूख्मीनी दिदी यांनी धर्म, संस्कार, संस्कृती अध्यात्म परमपिता परमेश्वर व भागवतगितेवर प्रभावीपणे विचार मांडले. नकारात्मक दृष्टीकोन अहंकार, व्देष या भावनेचा त्यांग करून सर्वांप्रती चांगली भावना ठेवा असे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ब्रम्हकुमारी ज्योती दिदी यांनी केले. तर संचालन ब्रम्हकुमारी किरण दिदी यांनी केले. आभार ब्रम्हकुमारी पुजा दिदी यांनी मानले. कार्यक्रमाला धर्मप्रेमी बांधव, महिला मोठया संख्येने उपस्थित होते.