महानगरपालिका अभियंत्यास 1.30 लाखांची लाच घेताना अटक

22 Feb 2026 20:14:53
*लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

चंद्रपूर,
Municipal Corporation Chandrapur चंद्रपूर शहर महानगरपालिकेत पंतप्रधान आवास योजनेंतर्गत अतिक्रमण विभागाचा अतिरिक्त कार्यभार असलेले स्थापत्य अभियंता शुभम नंदकिशोर वरघट याने (30) भंगार व्यवसायिकाकडून एका खाजगी व्यक्तीमार्फत 1 लाख 30 हजार रुपये लाचेची मागणी केली आणि स्वीकारली. त्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली असून, ही कारवाई शनिवार, 21 फेब्रुवारी रोजी करण्यात आली. तक्रारदाराचे चंद्रपूर येथील भंगाराम वॉर्डात भंगार (स्कब्र) चे दुकान आहे. त्यांनी 2020 मध्ये इरई नदीकाठावरील 1200 स्केअर फुटांचे बांधकाम असलेले घर खरेदी केले होते. नंतर ते तोडून सुरक्षाभिंत आणि टिनाचे शेड टाकून त्या जागेचा ते भंगार साठविण्यासाठी वापरत करीत होते. त्यामुळे या जागेच्या मागील बाजूस असलेल्या प्लॉटधारकांनी रस्त्यासाठी अडचण येत असल्याची महानगरपालिकेकडे तक्रार केली. त्यावरून तक्रारदाराला महानगरपालिकेकडून नोटीसही मिळाली होती.
 
 
ch sz
 
Municipal Corporation Chandrapur  14 फेब्रुवारी 2026 रोजी तक्रारदाराने शुभम वरघट आणि इतर एक व्यक्ती दिनेश समद्दर यांची भेट घेतली. त्यावेळी वरघट याने तुमचे बांधकाम अनाधिकृत असून, ते न तोडण्यासाठी 3 लाख रूपयांच्या लाचेची मागणी केली. त्यानंतर झालेल्या तहजोडी अंती 2 लाख 30 हजार रूपये देण्याचे ठरले. त्यानुसार 17 फेब्रुवारी 2026 रोजी तक्रारदाराने 1 लाख रूपये वरघट यांच्या सांगण्यावरून दिनेश समद्दर याच्याकडे दिले. मात्र, उर्वरित 1 लाख 30 हजार रूपये शुभम वरघट व दिनेश समद्दर यांना देण्याची तक्रारदाराची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. तक्रारीवरून शनिवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून शुभम वरघट याच्याकरिता 1 लाख 30 हजार रूपये लाच घेताना दिनेश समद्दर यास रंगेहात पकडले. शुभम वरघट व दिनेश समद्दर या दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक डॉ. दिगंबर प्रथान, अपर पोलिस अधीक्षक माथुरी बावीस्कर, पोलिस उपअधीक्षक मंजुषा भोसले यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक सचिन धर्मेजवार, पोलिस शिपाई अमोल सिडाम, राकेश जांभुळकर, राजेंद्र चौधरी, रविकांत इंगळे, विजेंद्र वाढई, प्रदिप ताडाम, मेघा मोहुर्ले, सतीश सिडाम, संदीप कवरासे यांनी केले.
Powered By Sangraha 9.0