मुंबई,
Shakira जागतिक संगीत क्षेत्रातील दिग्गज आणि आपल्या मनमोहक डान्स मूव्ह्जने चाहत्यांच्या मनावर छाप सोडणारी पॉप स्टार Shakira १९ वर्षांनंतर पुन्हा एकदा भारतीय रंगमंचावर पदार्पण करणार आहे. खास म्हणजे, शकीरा या ऐतिहासिक दौऱ्यात केवळ एका शहरात नाही तर मुंबई आणि दिल्ली या दोन प्रमुख शहरांमध्ये आपल्या संगीताचे जादू दाखवणार आहे. या बातमीने भारतीय संगीतप्रेमींमध्ये आनंदाची लाट निर्माण केली असून सोशल मीडियावरही या दौऱ्याचीच चर्चा रंगली आहे.
आयोजकांच्या अधिकृत माहितीनुसार, शकीराचा भारत दौरा अत्यंत भव्य स्वरूपात आयोजित केला आहे. पहिला परफॉर्मन्स १० एप्रिल रोजी मुंबईत पार पडणार आहे, तर दुसरा १५ एप्रिल रोजी दिल्लीमध्ये होईल. या दोन्ही शहरांमध्ये तिची मोठी फॅन फॉलोइंग असल्याने दोन्ही कॉन्सर्ट्स ‘हाउसफुल’ होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
शकीरा आणि Shakira भारताचे नाते जुने असून तिने शेवटचा परफॉर्मन्स २००७ मध्ये मुंबईत तिच्या ‘ओरल फिक्सेशन टूर’ (Oral Fixation Tour) दरम्यान दिला होता. तब्बल १९ वर्षांनी भारतात परतत असलेल्या शकीराने आपल्या पुनरागमनाबद्दल उत्साह व्यक्त करत एका निवेदनात म्हटले, “भारतात परफॉर्म करणे माझ्यासाठी नेहमीच खास राहिले आहे. मुंबई आणि दिल्लीतील चाहत्यांशी पुन्हा जोडले जाणे हा माझ्यासाठी अविस्मरणीय अनुभव असेल.” विशेष म्हणजे, हा कॉन्सर्ट ‘फीडिंग इंडिया कॉन्सर्ट’ म्हणून आयोजित केला जात असून, माध्यमातून शकीरा मुलांचे पोषण आणि उज्वल भविष्य याचा संदेश देणार आहे.शकीराची संगीत कारकीर्द तीन दशकांहून अधिक काळ टिकलेली आहे. ९० च्या दशकात तिने आपल्या प्रवासाला सुरुवात केली आणि अल्पावधीतच जगातील सर्वात लोकप्रिय पॉप सिंगर्समध्ये अग्रस्थानी पोहोचली. तिची ऊर्जा, बेली डान्स शैली आणि स्टेजवरील उपस्थिती ‘हिप्स डोन्ट लाय’, ‘व्हेनएव्हर, व्हेरएव्हर’, ‘वाका वाका’, ‘शी वुल्फ’ आणि ‘ला टोर्टुरा’ यांसारख्या गाण्यांमुळे जागतिक स्तरावर ती ओळखली जाते.भारतीय प्रेक्षकांसाठी शकीराचा हा दौरा संगीत आणि नृत्याचा परिपूर्ण उत्सव ठरणार असून, तिच्या स्टेजवरील जोश आणि चाहत्यांशी सजीव संवाद अनुभवण्यासाठी हा कार्यक्रम नक्कीच अविस्मरणीय ठरणार आहे.