हिंदी विद्यापीठात शिवजयंतीनिमित्त सार्वजनिक सुटीच्या आदेशाचे उल्लंघन

22 Feb 2026 18:22:06
वर्धा,
Shiv Jayanti, महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशात उत्साहात साजरी केली जाते. ज्यांचा आदेश घेऊन आपण राज्य कारभार चालवतो, अशा छत्रपतींच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र शासनाने सार्वजनिक सुटी घोषित केली आहे. मात्र, येथील आंतरराष्ट्रीय हिंदी विश्व विद्यापीठाने यावर्षीपासून ही सुटी रद्द करून शासनाच्या आदेशाचे उल्लंघन केले आहे. ही बाब गंभीर असून शासन स्तरावर चौकशी करून विद्यापीठातील दोषी अधिकार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी भाजपा विधानसभा प्रमुख तथा नगरसेवक नीलेश पोहेकर यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना पाठविलेल्या पत्रातून केली आहे.
 

Shiv Jayanti, Maharashtra government holiday, 
नव्या पिढीला शिवाजी महाराजांच्या विचारांचा व कर्तृत्त्वाचा विसर पडू नये म्हणून १९ फेब्रुवारी रोजी गावागावातील चौकाचौकांमध्ये शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते. शासनस्तरावर सुद्धा शिवजयंतीचा सोहळा साजरा करण्यात येतो. परंतु, वर्धेतील आंतरराष्ट्रीय हिंदी विश्व विद्यापीठाने यावर्षीपासून नवीन पायंडा घालायला सुरूवात केली आहे. महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक सुटीच्या आदेशाला हरताळ फासत सदर सुट्टी यावर्षीपासून रद्द करण्याचा नवीन अनोखा आदेश निर्गमित केला आहे. यामुळे विद्यालयातील आणि वर्धेतील शिवप्रेमींमध्ये मोठा नाराजीचा सूर पहायला मिळत आहे. हिंदी विद्यापीठ यापूर्वीसुद्धा अशाच प्रकारच्या विरोधी कृत्यांमुळे चर्चेत राहिले आहे. केंद्र शासनाच्या अधीन असलेल्या या संस्थेत देशविरोधी व अर्बन नक्षलवादाला खतपाणी घालणारे कर्मचारी व प्राध्यापक पूर्ण अनुदानित वेतनश्रेणीवर काम करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. या तुकडे तुकडे गँगचा कायमचा बंदोबस्त करणे क्रमप्राप्त असून शासनाचा अंकुश यावर असणे अपेक्षित असल्याचेही पत्रात नमूद केले आहे.
ही बाब अतिशय गंभीर असून याप्रकरणाची शासन स्तरावर चौकशी करावी आणि असा तुघलकी आदेश काढणार्‍या अधिकार्‍यांवर कारवाई करून शिवप्रेमींना न्याय द्यावा, अशी मागणीही करण्यात आली आहे. या पत्राच्या प्रती पालकमंत्री डॉ. पंकज भोयर आणि भाजपा जिल्हाध्यक्ष संजय गाते यांना पाठविण्यात आल्या आहेत.
Powered By Sangraha 9.0