वाघ लागला डुकरांच्या मागे जीव गेला बैलाचा! बैलबंडी थेट विहिरीत!

22 Feb 2026 20:02:28
*एक बैल व शेतकरी जखमी
 
समुद्रपूर, 
Tiger attack कारंजा (घा.) तालुयात जंगलातील झुडपात दडून बसलेल्या वाघाने शेतात जाणार्‍या बैलांवल हल्ला करण्याचा प्रयत्न केेल्याने बैल बिथरले आणि दोन्ही बैल फास लागून ठार झाले होते. त्या हल्ल्याला आठवडा उलटत नाही तोच समुद्रपूर तालुयात बैल ठार झाला. यावेळी वाघ डुकराच्या मागे लागल्याने बैल भुजाडल्याने हा अपघात झाला. ही घटना शनिवार २१ रोजी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास कोरा गावाजवळील नारायणपूर येथे घडली. शेतातील कापूस बैलबंडीमध्ये भरून घरी जात असताना डुकरांच्या कळपामागे वाघ लागल्याचे पाहून बैल बिथरले आणि बंडीसह बैल विहिरीत जाऊन कोसळले. या विचित्र घटनेत एका बैलाचा मृत्यू झाला तर दुसर्‍याला वाचविण्यात यश आले. या घटनेत शेतकरी थोडयात बचावला.
 
 
wagh
 
Tiger attack  सध्या शेतात मजुरांकडून कापूस वेचणीची कामं केली जात आहेत. दिवसभर वेचलेल्या कापसाचे गाठोडे बांधून शेतमालक बैलबंडीने घरी नेतात. दरम्यान, काल शनिवारी नारायणपूर येथील शेतकरी श्रीधर सालवटकर (५५) हे सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास शेतातील कापूस बैलगाडीमध्ये भरून निघत असतानाच बैलगाडीसमोर रानडुकरांचा कळप आला. रानडुकरांना पाहताच बैल थांबले. मात्र, या रानडुकरांच्या मागे असलेला वाघ दिसताच बैल बिथरले आणि बैलगाडीसह सैरावैरा पळायला लागले अन् बैल नजिकच्या विहिरीत बैलगाडीसह कोसळले. शेतकरी श्रीधर सालवटकर यांनी प्रसंगावधान राखत बैलगाडीवरून बाजूला झाल्याने ते थोडयात बचावले. मात्र, ते जखमी झाले. या घटनेची माहिती शेतकरी सालवटकर यांनी कोरा येथील मनोज बारसकर यांना दिली. बारसकर यांनी सहकार्‍यांसह घटनास्थळी धाव घेतली. यावेळी मोठ्या प्रमाणात गावकरी सुद्धा पोहोचले. विहीर जवळपास ५५ फुट खोल व त्यात ३० फुट पाणी आणि अंधार असल्याने ४ विंटल कापूस भरून असलेल्या बैलगाडी व बैलांना बाहेर काढण्याचा पेच निर्माण झाला. संदीप मारबते, उल्हास पडवे, चंद्रशेखर पिसे, स्वप्निल ईखार, खैराज यादव, प्रफुल्ल सालवटकर व कोरा येथील भोई समाजातील युवक व गावकर्‍यांच्या मदतीने जेसीबी व ट्रॅटरच्या सहाय्याने विहिरीत उतरून एका बैलाला जिवंत काढण्यात यश आले, मात्र दुसर्‍या बैलाला वाचवण्यात अपयश आले. शेतकरी श्रीधर सालवटकर यांनी १५ दिवसांपुर्वीच २ लाख रुपये किमतीची बैलजोडी विकत घेतली होती. घटनेची माहिती मिळताच गिरडचे ठाणेदार विकास गायकवाड यांच्या मार्गदर्शनात पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे.
Powered By Sangraha 9.0