नवी दिल्ली,
UGC declares 32 universities विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) संपूर्ण देशातील 32 विद्यापीठांना बोगस घोषित केले आहे. या शैक्षणिक संस्थेत पदवी घेणाऱ्या विद्यार्थ्यांना नोकरी आणि पुढील शिक्षण नाकारले जाईल, असे आयोगाने स्पष्ट केले.
यूजीसीने विद्यार्थ्यांना कोणत्याही महाविद्यालय किंवा विद्यापीठात प्रवेश घेण्यापूर्वी त्याची मान्यता तपासण्याचे आवाहन केले आहे. या 32 विद्यापीठांना केंद्र सरकार, राज्य सरकारकडून कुठलीही मान्यता मिळाली नसल्याने आयोगाने म्हटले आहे.
यूजीसीच्या या यादीनुसार, दिल्लीतील सर्वाधिक 12 विद्यापीठे बनावट असल्याचे समोर आले आहे. दिल्लीनंतर उत्तरप्रदेशातील चार विद्यापीठांचा समावेश आहे. इतर राज्यातही काही शिक्षण संस्था कुठल्याही मान्यतेशिवाय सुरू असल्याचे यूजीसीने म्हटले आहे.
कोणत्या राज्यात किती बनावट विद्यापीठे?
दिल्ली - 12
उत्तरप्रदेश- 4
आंध्रप्रदेश-2
महाराष्ट्र-2
कर्नाटक-2
केरळ- 2
पुदुचेरी-2
पश्चिम बंगाल-2
अरुणाचल प्रदेश-1
हरयाणा-1
झारखंड-1
राजस्थान-1
महाराष्ट्रातील दोन विद्यापीठांचा समावेश
यूजीसीच्या 32 बोगस विद्यापीठांच्या यादीत महाराष्ट्रातील दोन विद्यापीठांचा समावेश आहे. त्यात नागपूर येथील राजा अरबी विद्यापीठ आणि सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रीय मागासवर्गीय कृषी विद्यापीठाचा समावेश आहे.