भाजप आमदारांसह शंभर कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

23 Feb 2026 10:09:50
रांची,
100 BJP workers including MLAs झारखंडमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची धामधूम सुरू असताना भारतीय जनता पक्षाचे आमदार तसेच विरोधी पक्षनेते बाबूलाल मरांडी आणि त्यांच्या सुमारे शंभर पदाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सदर प्रखंडातील मंगरोडीह ग्रामपंचायतीचे पंचायत सचिव व उड्डाण पथकाचे अधिकारी मो. मन्सूर यांच्या तक्रारीवरून नगर पोलीस ठाण्यात ही कारवाई करण्यात आली. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, २१ फेब्रुवारी रोजी सायंकाळी आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होत असल्याची माहिती दूरध्वनीवरून प्राप्त झाली. त्यानंतर निवडणूक प्रतिनिधी प्रवीण मेहरा यांच्या लेखी तक्रारीच्या आधारे गिरिडीह येथील बसस्थानकाजवळ असलेल्या मां काली हॉटेलमध्ये तपासणी करण्यात आली. तेथे बाबूलाल मरांडी आणि त्यांचे सुमारे ऐंशी ते शंभर समर्थक बैठक घेत असल्याचा आरोप आहे.
 
 
100 BJP workers including MLAs
 
 
हॉटेल परिसरात अनेक वाहने उभी असल्याचे तसेच संपूर्ण घटनेचे चित्रिकरण व छायाचित्रे काढण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. २१ फेब्रुवारी हा प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने कोणतीही अधिकृत परवानगी न घेता मोठा जमाव जमविणे हे आचारसंहितेचे उल्लंघन ठरते, असे प्रशासनाचे म्हणणे आहे. या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना बाबूलाल मरांडी यांनी आपण केवळ भोजनासाठी हॉटेलमध्ये गेलो होतो, कोणतीही बैठक आयोजित केली नव्हती, असा दावा केला आहे. मात्र पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू ठेवला आहे. ज्या मां काली हॉटेलमध्ये बैठक झाल्याचा आरोप आहे ते हॉटेल भाजप कार्यकर्ता सिंकू सिन्हा यांचे असल्याचे सांगितले जात असून त्यांच्याविरुद्धही बीएनएसएस कलम १६३ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. गिरिडीह येथील अनुमंडल पदाधिकाऱ्यांनी यापूर्वीच आदेश काढून संबंधित कलम लागू केले होते.
 
दरम्यान, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण आधीच तापलेले असताना एका आमदाराच्या वाहनावर स्फोटक फेकल्याची धक्कादायक घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेत संबंधित आमदाराचा जीव थोडक्यात बचावला असून राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. तसेच एका ज्येष्ठ नेत्याने अनेक वर्षांची साथ सोडून भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्याने राजकारणात नव्या घडामोडींना वेग आला आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर विरोधी पक्षनेत्यांसह मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यामुळे झारखंडच्या राजकारणात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. पुढील निर्णय आणि तपासाच्या निष्कर्षांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Powered By Sangraha 9.0