अजित पवार म्हणजे भावनिक आठवणींचा संघर्ष

23 Feb 2026 17:31:56
मुंबई
Rohit Pawar राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होताच विधानसभेत दिवंगत नेते अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच अनेक महत्त्वाचे नेते उपस्थित होते आणि त्यांनी अजितदादांच्या स्मृतींना उजाळा दिला. यावेळी रोहित पवार यांनीही भाषणात दिवंगत नेत्यांविषयी आठवणी व्यक्त केल्या आणि त्यांना न्याय मिळावा, असा आग्रह धरला.
 

अजित पवार म्हणजे भावनिक आठवणींचा संघर्ष 
सभागृहात बोलताना रोहित पवार म्हणाले की, “अजितदादांवर नको नको असे आरोप झाले. ते अस्वस्थ व्हायचे, पण एकही आरोप सिद्ध झाला नाही. आता दादा नाहीत, त्यामुळे हे आरोप व डाग पुसले पाहिजेत. आरोपांचे गाठोडे समुद्रात टाकले तर ते त्यांना आदरांजली ठरेल.” त्यांनी अजित पवार यांच्या कार्यपद्धतीची आठवण करून सांगितली की, “दादा हे सभागृहात पहिले येणारे आणि शेवटी जाणारे नेते असायचे. चुकले तर कान पकडायचे, चांगले बोलले तर स्तुती करायचे. व्यक्तिगत व बेकायदेशीर विषय घेतल्यास त्यांना राग यायचा.”रोहित पवार यांनी अजित पवार यांचा व्यक्तिमत्व आणि त्यांच्या कुटुंबाशी असलेला जवळचा नाताही अधोरेखित केला. त्यांनी सांगितले की, “माझ्या काकी, म्हणजे सुनेत्रा पवार यांच्या मदतीसाठी मी कायम उभा राहीन. माझे लग्न हे दादांनी ठरवले होते. पक्ष वेगळा झाला तरी काही गोष्टी बोलल्या गेल्या असतील. गेल्या काही महिन्यात आमच्या बैठका झाल्या. प्रशासनावर वचक असणारा नेता गेला, लोकनेता गेला, रूबाब गेला, रांगडेपणा गेला, राज्याच्या राजकारणातील मिश्किलपणा गेला.”
 
 
भावनिकपणे Rohit Pawar  बोलताना रोहित पवार म्हणाले की, “अजितदादा मला झिपऱ्या कमी कर म्हणायचे, राजकीय वजन वाढवत जा, शारीरिक वजन कमी कर, असं सांगायचे. आता मी जो लढा लढतोय, त्या लढ्याबद्दल दादाही मला शाबासकी देतील. दादांच्या मृत्यूबद्दल आरोपींना तुरुंगात टाकल्याशिवाय हा लढा थांबणार नाही, असा माझा निश्चय आहे.”अधिवेशनाच्या सुरूवातीला झालेल्या या श्रद्धांजलीत विधानसभेत उपस्थित नेते आणि सदस्य भावनिक झाले होते. रोहित पवार यांच्या शब्दांनी अजित पवार यांच्या कार्यकाळाची आठवण ताजी केली आणि त्यांच्या योगदानाला सन्मान मिळाला. दिवंगत नेत्यांविषयी असा भावपूर्ण सन्मान राज्याच्या राजकारणातील एक स्मरणीय घटना म्हणून नोंदवला जाईल.
 
Powered By Sangraha 9.0