बुलढाणा,
Chhatrapati Shivaji Maharaj statue dispute बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील चिखला काकड येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा अर्धाकृती पुतळा विनापरवानगी बसवण्यात आल्याच्या प्रकरणाने आता गंभीर वळण घेतले आहे. या घटनेमुळे गावात दोन गटांमध्ये तणाव निर्माण झाला असून परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रशासनाने पुतळा हटवण्याचे लेखी आदेश निर्गमित केले आहेत. संबंधित शासकीय कागदपत्रे समोर आल्यानंतर या प्रकरणातील घडामोडींना वेग आला आहे.
पोलिसांचा बंदोबस्त आणि आदेश
मिळालेल्या माहितीनुसार, ४ फेब्रुवारी २०२६ रोजी मध्यरात्री काही अज्ञात व्यक्तींनी चिखला काकड येथील अंगणवाडी परिसरात लोखंडी स्टँडवर शिवाजी महाराजांचा अर्धाकृती पुतळा बसवला. सार्वजनिक जागेवर कोणतीही पूर्वपरवानगी न घेता हा पुतळा उभारण्यात आल्याने गावात वाद निर्माण झाला. या वादातून एका महिलेला मारहाण झाल्याची घटना घडल्याचेही समोर आले असून त्यामुळे परिस्थिती अधिक संवेदनशील बनली आहे.प्रशासनाने या घटनेची दखल घेत टप्प्याटप्प्याने कारवाई सुरू केली. ५ फेब्रुवारी रोजी बीबी पोलीस Chhatrapati Shivaji Maharaj statue dispute स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांनी लोणार तहसीलदार यांना अहवाल सादर केला. या अहवालात पुतळा अनधिकृतरित्या बसवण्यात आल्याचे नमूद करण्यात आले असून गावकऱ्यांनी तो स्वखुशीने काढण्यास नकार दिल्याची माहिती देण्यात आली. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून तहसीलदार स्तरावर निर्णय घेऊन आवश्यक कारवाई करावी, अशी शिफारस करण्यात आली.यानंतर ११ फेब्रुवारी रोजी लोणार तहसील कार्यालयाकडून गटविकास अधिकारी आणि ग्रामपंचायत प्रशासनाला लेखी आदेश देण्यात आले. संबंधित आदेशात कोणतीही कायदेशीर परवानगी न घेता पुतळा उभारण्यात आल्याने तो तात्काळ हटवण्यात यावा, असे स्पष्ट नमूद करण्यात आले आहे. पुतळा हटविताना आवश्यक तेवढा पोलीस बंदोबस्त उपलब्ध करून देण्याचे आश्वासनही प्रशासनाने दिले आहे.
दरम्यान, गावातील तणाव वाढत असल्याने २२ फेब्रुवारी रोजी मेहकरचे उपविभागीय दंडाधिकारी यांनी चिखला काकड येथे भारतीय नागरी सुरक्षा संहिता २०२३ मधील कलम १६३, म्हणजेच पूर्वीचे कलम १४४, लागू केले. त्यानुसार २२ फेब्रुवारी सायंकाळी ७ वाजेपासून २६ फेब्रुवारी सकाळी ११ वाजेपर्यंत गावात प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र जमण्यास, मिरवणुका काढण्यास तसेच सोशल मीडियावरून अफवा पसरवण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.सध्या गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून परिस्थिती नियंत्रणात असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. नागरिकांनी शांतता राखावी आणि अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन अधिकाऱ्यांनी केले आहे. मात्र, विनापरवानगी पुतळा बसवणाऱ्या अज्ञात व्यक्तींचा शोध घेणे आणि कोणताही अनुचित प्रकार न घडता पुतळा हटवण्याची प्रक्रिया पूर्ण करणे, हे प्रशासनासमोर मोठे आव्हान ठरणार आहे.