दिल्लीतील महाराष्ट्र सदनाला धमकीचा मेल!

23 Feb 2026 11:21:17
नवी दिल्ली,
Maharashtra Sadan in Delhi दिल्लीतील महाराष्ट्र सदनाला धमकीचा मेल आला आहे. बॉम्बने उडवून देऊ, अशी धमकी यात देण्यात आली आहे. सोमवारी सकाळी विधानसभेला तसेच ऐतिहासिक लाल किल्ला परिसराला स्फोट घडवून आणण्याची धमकी देणारा संदेश प्राप्त झाल्याने प्रशासन तात्काळ सतर्क झाले. धौला कुआं परिसरातील आम पब्लिक स्कूललाही पहाटेच्या सुमारास धमकीचा संदेश मिळाला होता. त्या संदेशात सकाळी ठरावीक वेळी महत्त्वाच्या ठिकाणी स्फोट घडवले जातील, असा इशारा देण्यात आला होता.
 
 
Maharashtra Sadan in Delhi
 
संदेश मिळताच शाळा प्रशासनाने त्वरित पोलिसांना कळविले. त्यानंतर विधानसभेभोवती व लाल किल्ला परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आणि सखोल तपासणी मोहीम हाती घेण्यात आली. आतापर्यंत कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नसल्याने काहीसा दिलासा मिळाला असला तरी खबरदारीचा उपाय म्हणून सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे. या सर्व घटनांनंतर पोलिसांनी संदेश पाठविणाऱ्याचा माग काढण्यासाठी विशेष तांत्रिक पथकाला कामाला लावले असून संदेशाचा उगम शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हा केवळ खोडसाळपणा आहे की मोठ्या कटाचा भाग, याचा तपास सध्या सुरू आहे.
Powered By Sangraha 9.0