कोलकाता,
Mukul Roy passes away माजी रेल्वेमंत्री आणि तृणमूल नेते मुकुल रॉय यांचे पहाटे २:३५ वाजता अपोलो रुग्णालयात निधन झाले, ते ७२ वर्षांचे होते आणि गेल्या काही महिन्यांपासून ते कोमात होते. डॉक्टरांच्या माहितीनुसार, हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. मुकुल रॉय यांनी प्रकृतीच्या कारणामुळे त्यांनी काही वर्षांपूर्वी सक्रिय राजकारणातून माघार घेतली होती. २०२३ च्या सुरुवातीला त्यांना डिमेंशिया आणि पार्किन्सन आजार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते, ज्यामुळे त्यांची स्मरणशक्ती आणि शारीरिक क्षमता कमी झाली होती.

तृणमूल काँग्रेसमध्ये ते ममता बॅनर्जींच्या नंतर दुसऱ्या क्रमांकाचे नेता मानले जात होते. पक्षातील संकटे हाताळणे, निवडणूक धोरण आखणे आणि पक्षाला बळकटी देण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. २०१० च्या दशकात शारदा चिट फंड घोटाळ्यासारख्या कारणांमुळे त्यांचे तृणमूल काँग्रेसशी संबंध बिघडले. फेब्रुवारी २०१५ मध्ये त्यांना पक्षातून राष्ट्रीय महासचिव पदावरून हटवण्यात आले, सप्टेंबर २०१७ मध्ये त्यांनी राजीनामा दिला आणि नोव्हेंबर २०१७ मध्ये भाजपामध्ये प्रवेश केला. जून २०२१ मध्ये ते पुन्हा तृणमूल काँग्रेसमध्ये परतले.