आता कळेल वेदनेचा अर्थ

23 Feb 2026 09:44:14
अग्रलेख

ramjan month इस्लाममध्ये रमजान या नवव्या महिन्याला अत्यंत महत्त्व आहे. हा महिना मांगल्याचे प्रतीक असल्याने त्याला कृपाप्रसादाचा महिनाही म्हणतात. पवित्र कुराणचे अवतरण याच महिन्यात झाले. रमजानचे पहिले दशक कृपेचे, दुसरे क्षमेचे तर नरकापासून मुक्ततेचे मानले जाते. त्यामुळे या काळात इबादत करणाऱ्यास अल्लाह क्षमादान देईल आणि नरकापासून मुक्तता देईल. त्यामुळेच अल्लाहचे बंदे संसार, व्यापाराचा त्याग करून अल्लाहला शरण जातात. अशा या पवित्र महिन्यात शांतता असावी, अशी अपेक्षा निदान इस्लामिक स्टेट ऑफ पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या देशांकडून आहे. कारण आम्हीच इस्लामचे रखवाले असल्याची आवई हे देश देत असतात. मात्र, धर्माच्या नावावर या दोन्ही देशांमध्ये माणसांचे जेवढे जीव घेतले गेले आहेत तेवढे अन्य कुठल्याही देशामध्ये आढळणार नाही. विशेष म्हणजे हे दोन्ही देश कधीकाळी अखंड हिंदुस्थानचेच तुकडे होते. हिंदू आणि बौद्ध राजांच्या राजवटी कधीकाळी अफगाणिस्तानात सुखाने नांदत होत्या.

 

रमजान  
 
 
खैबर आणि बोलन खिंडींच्या अलिकडचा भागही, जो आज पाकिस्तान आहे, भरभराटीस आलेला होता. पण, धर्म म्हणजे अफूची गोळी, हे वाक्य निदान अफगाणिस्तान-पाकिस्तान या दोन्ही देशांसाठी तंतोतंत लागू पडते. जगातील छोटे छोटे देश विकासाचे उंच उंच इमले बांधत असताना साधन संपत्तीने समृद्ध असतानाही पाकिस्तान-अफगाणिस्तान दरिद्री अवस्थेत खितपत पडलेले आहेत. कारण काय तर एकच आणि ते म्हणजे धर्माचा अतिरेक. भूतकाळात अफगाणिस्तानने सहिष्णूता, शांततेचा पुरस्कार करणाऱ्या हिंदुस्थानचा प्रचंड छळ केला. सबुक्तगीन, गझनी, घोरी, खिल्जी, मोघल आणि अब्दाली या क्रूर शासकांनी लक्षावधी नागरिकांची कत्तल करीत अगणित संपत्ती लुटून नेली. पण, लुटारूंच्या या देशाची आजची परिस्थिती काय आहे? आज जवळपास 45 वर्षांपासून म्हणजे 1979 मधील रशियाच्या आक्रमणानंतर अफगाणिस्तान जगापासून तुटला आहे, कंगाल-भंगार झाला आहे. धर्माच्या नावावर लुटमार करणाऱ्या दरोडेखोरांच्या नशिबी आणखी काय येणार? हिंदुस्थानची कबर खोदण्याची स्वप्ने पाहणारे हे दोन्ही देश आता त्याच कबरीच्या काठावर आहेत. हा सर्व काळ भूतकाळ मांडण्याचे कारण एकच की, जसे तुम्ही कराल, तसेच तुम्हाला भरावे लागणार आहे. भारतीय जीवन दर्शनातील ‘यादृशं कुरूते कर्म तादृशं फलमृश्ते ।’ हा संस्कृत श्लोकसुद्धा हेच दर्शविते. रमजानचा पवित्र नववा महिन्याचे उपवास सुरू आहेत. हा महिना पवित्रता, त्याग, संयम, नैतिकता आणि बंधुत्वाची शिकवण देणारा आहे. थोडक्यात हा महिना म्हणजे अल्लाहच्या जवळ जाण्याचा आणि स्वतःमध्ये सकारात्मक बदल घडवून आणणारा आहे. या पवित्र महिन्यात पाकिस्तानने मात्र अफगाणिस्तानवर हवाई हल्ला करून 17 निष्पाप नागरिकांचे बळी घेण्याचे सैतानालाही लाजवेल, असे कृत्य केले. रविवारी रात्री नागरिक झोपेत असताना पाकिस्तानच्या लढाऊ विमानांनी नानगाहर आणि पख्तिया प्रांतात तीन हल्ले केले. या हल्ल्यात महिला आणि मुलांसह झोपेत असलेल्या 17 नागरिकांचा मृत्यू झाला. एक मदरसा आणि काही मातींच्या घरांवर शक्तिशाली बॉम्ब पडल्याने नागरिक मलब्यात दबून ठार झाले. 2021 मध्ये तालिबान सत्तेवर आल्यापासून दोन्ही इस्लामिक बंधू असलेले हे दोन्ही देश एकमेकांच्या जिवावर उठले आहेत. खरे तर तालिबानचे पालनपोषण करणारा पाकिस्तानच आहे. या इस्लामिक बरादरचा उपयोग हिंदुस्थानच्या विरोधात विशेषतः जम्मू-काश्मिरात करण्याचे कुटिल मनसुबे पाकिस्तानने आखले होते. पण, झाले उलटेच. भारताचे तर कुणी काहीही वाकडे करू शकले नाही; उलट हे दोन्ही देश गृहयुद्धात अडकले आहेत. 1990 च्या दशकात काश्मिरात जेव्हा दहशतवादाला सुरुवात झाली तेव्हा अफगाणिस्तानातील दहशतवाद्यांनाच घुसविण्यात आले होते.ramjan month अकबर भाई हे त्यापैकी एक नाव. रशियन सैन्य परत गेल्यानंतर या दहशतवाद्यांना काही कामधंदा नसल्याने पाकिस्तानी सैन्याने त्यांना काश्मिरात पाठविले होते. हा अकबर अफगाणिस्तानातील हिकमतयार या दहशतवादी गटाचा प्रमुख गुलबदीन हिकमतयार याचा अंगरक्षक होता. 1993 मध्ये सोपोरजवळ भारतीय जवानांनी अकबरला ठार केले. 1996 मध्ये तालिबानने काबूल जिंकल्यानंतर काश्मिर खोèयात मोठ्या प्रमाणात हिंसाचार वाढला होता. आकडेवारीसुद्धा हेच सांगते. गेल्या चार दशकांत जेवढे नागरिक, सुरक्षा जवान आणि दहशतवादी हिंसाचारात ठार झाले त्यापैकी 40 टक्के 1996 ते 2001 या काळात मारले गेले. कारण या काळातच अफगाणिस्तानात तालिबान सत्तेवर होते. अमेरिकेवरील हल्ल्यानंतर तालिबानला सत्तेवरून हाकलून लावल्यानंतर परिस्थिती बदलली. अफगाणी दहशतवाद्यांनी नंतर काश्मीरकडे वळूनही पाहिले नाही. तसेही 1990 पासून काश्मीर खोèयात फक्त 84 अफगाणी दहशतवाद्यांची उपस्थिती दिसून आली. यापैकी काही चकमकीत ठार झाले तर काही पळून गेले. त्यानंतर जवळपास 10 वर्षे अफगाणिस्तानात शांतता होती. 2021 मध्ये पुन्हा तालिबान सत्तेवर आल्याने पाकिस्तानने पुन्हा एकदा तालिबान्यांच्या मदतीने काश्मिरात आग लावण्याचे प्रयत्न केले. पण, हे तालिबानी काही 1990 च्या काळातील नव्हते. धर्माच्या नावावर हिंसा केली तर मरणच नशिबी येणार, सुख नव्हे याची जाणीव या पुढारलेल्या तालिबान्यांना झाली. पैसा, संपत्ती, सत्ता आणि पळून गेलेल्या अमेरिकन सैनिकांची शस्त्रे व वाहने हाती लागल्याने ही सर्व साधने आणि सुखाचा पाकिस्तान म्हणेल म्हणून त्याग करायला हे तालिबानी काही मूर्ख आणि बावळट नव्हते. तसेच या तालिबान्यांचा मूळ पिंड हा पेंढाऱ्यांचाच आहे. सत्तेमुळे सुखावलेले आणि खुर्चीसाठी चटावलेले तालिबान आपल्या तालावर नाचत नसल्याचे पाहून पाकिस्तानचे डोके फिरले आणि त्यांनी अफगाणी निर्वासितांना हाकलून देण्यास सुरुवात केली. गेली तीन दशके पाकिस्तानात राहणाऱ्यांना अफगाणींना हाकलल्याने दोन्ही देशांत निर्माण झालेला तणाव अजूनही कायम आहे. जमिनी युद्धात तरबेज असलेल्या तालिबानकडे हवाई युद्ध क्षमता नाही तसेच क्षेपणास्त्रेही नाहीत. त्यामुळे हानी टाळण्यासाठी पाकिस्तानने 2021 पासून अफगाणिस्तानवर पाच वेळा हवाई हल्ले करून शेकडो नागरिकांचा बळी घेतला. पहिला हल्ला एप्रिल 2022, दुसरा मार्च 2024, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर 2025 मध्ये दोन तर 21 फेब्रुवारी 2026 रोजी पाचवा हवाई केला. प्रतिहल्ला करण्याची क्षमता तालिबानकडे नाही. परिणामी योग्य वेळ पाहून आत्मघाती हल्ला अथवा सीमावर्ती भागात तैनात असलेल्या सैनिकांवर अचानक धावा बोलून पाकिस्तानची जेवढी मनुष्यहानी होईल तेवढी करण्याचा प्रयत्न तालिबान करीत असतो. ऑक्टोबर 2025 मध्ये झालेल्या धुमश्चक्रीत पाकिस्तानचे 50 पेक्षा जास्त सैनिक ठार झाल्यानंतर प्रचंड तणाव निर्माण होऊन व्यापार ठप्प झाला. दोन्ही देशांमध्ये 2600 किलोमीटर लांबीची सीमारेषा आहे. व्यापार बंद झाल्याने दोन्ही देशांचे प्रचंड आर्थिक नुकसान होत आहे. अफगाणिस्तानला भारत चाबाहार बंदरामार्फत खाद्यवस्तू आणि औषधांचा पुरवठा करीत आहे. मात्र, सीमा बंद असल्याने पाकिस्तानी व्यापारी हवालदिल झाले आहेत. या हल्ल्यानंतर तालिबान शांत बसणार नाही, एवढे मात्र नक्की. निष्पाप मुले आणि महिलांचा हल्ल्यात मृत्यू झाल्याने चवताळलेल्या तालिबानने या हल्ल्यांचा योग्य ठिकाणी आणि योग्यवेळी सूड घेण्याची घोषणा केली आहे.ramjan month परिणामी आणखी एक हल्ला आणि प्रतिहल्ला अशी सूड उगविण्याची मालिका कायम राहणार आहे. कधीकाळी जो पाकिस्तान सीमापार दहशतवादाचा वापर करीत हिंदुस्थानला जखमा करीत होता त्याच जखमा आता तालिबान पाकिस्तानला करीत आहे. ज्या दहशतवादरूपी भस्मासुराला आशीर्वाद दिला, पालनपोषण केले तोच आता पाकिस्तानवर उलटला आहे. दहशतवादी हल्ल्यांमध्ये सैनिक आणि निष्पाप नागरिक ठार झाल्यानंतर झालेल्या जखमांच्या वेदना काय असतात, हे आता पाकिस्तानला कळू लागले आहे.
Powered By Sangraha 9.0