रॉब जेटन बनेत नेदरलँड्सचे सर्वात तरुण पंतप्रधान!

23 Feb 2026 16:24:57
अॅमस्टरडॅम,
Rob Jetton Young Prime Minister नेदरलँड्समध्ये नवीन युती सरकारची शपथविधी संपन्न झाली असून रॉब जेटन यांनी देशातील सर्वात तरुण पंतप्रधान म्हणून पदभार स्वीकारला आहे. बहुपक्षीय युतीतून स्थापन झालेल्या या सरकारला राजकीय स्थिरता आणि सहकार्याची नवीन सुरुवात साधण्याचे उद्दिष्ट आहे. गेल्या काही वर्षांपासून डच संसदेत गटबाजी आणि अंतर्गत कलहाचा सामना करावा लागत होता, ज्यामुळे निर्णय प्रक्रियेत अडथळे निर्माण झाले होते.
 
 
rob jetten
 
पंतप्रधान जेटन यांनी आपल्या प्राथमिकतेत संसदेत सहकार्याचे वातावरण निर्माण करणे, देशातील राजकीय संतुलन पुनर्संचयित करणे आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर नेदरलँड्सची मजबूत भूमिका सुनिश्चित करणे यावर भर दिला आहे. नवीन सरकार युरोपियन युनियनमध्ये नेदरलँड्सची प्रभावशाली भूमिका पुन्हा स्थापित करण्यासाठी प्रयत्नशील आहे. युरोपियन सहकार्य मजबूत करण्यासाठी लवकरच समकक्ष नेत्यांशी संवाद साधला जाईल, असे जेटन यांनी स्पष्ट केले. तसेच रशियाविरुद्ध युद्ध लढणाऱ्या युक्रेनला डच पाठिंबा सुरू राहील, ज्यामध्ये राजकीय, आर्थिक आणि संरक्षण सहकार्य यांचा समावेश असेल.
 
नवीन मंत्रिमंडळात विविध युती पक्षांचे प्रतिनिधित्व असून महत्त्वाच्या मंत्रालयांची जबाबदारी अनुभवी नेत्यांना देण्यात आली आहे. रॉब जेटन हे डेमोक्रॅट्स 66 पक्षाचे सदस्य असून त्यांनी यापूर्वी हवामान आणि ऊर्जा मंत्री म्हणून काम केले आहे. युरोपियन सहकार्य, हरित धोरणे आणि एकमत राजकारण हे त्यांचे प्रमुख अजेंडा मुद्दे आहेत. रॉब जेटन हे नेदरलँड्समधील एक प्रमुख उदारमतवादी नेते असून त्यांनी तरुण वयातच राष्ट्रीय राजकारणात महत्त्वपूर्ण ठसा उमटवला आहे. 1987 मध्ये जन्मलेले जेटन यांनी सार्वजनिक प्रशासनाचा अभ्यास केला आणि विद्यार्थीदशेपासूनच राजकारणात सक्रिय सहभाग घेतला आहे. त्यांच्या नेतृत्वाखालील सरकार डच राजकारणातील पिढीजात बदलाचे प्रतीक मानली जात आहे. तरुण नेतृत्व, युरोपियन सहकार्यावर भर आणि जागतिक मुद्द्यांवर सक्रिय भूमिका या माध्यमातून नेदरलँड्स येत्या काळात आपले आंतरराष्ट्रीय स्थान अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न करेल.
Powered By Sangraha 9.0