संजू सॅमसनला संधी मिळणार? प्रशिक्षकांचा मोठा संकेत

23 Feb 2026 10:35:48
अहमदाबाद,
Sanju Samson will get a chance अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या पराभवानंतर भारतीय संघाच्या रणनितीवर प्रश्न उपस्थित होत आहेत. २०२६ च्या टी-२० विश्वचषकातील सुपर आठ फेरीत सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारताला ७६ धावांनी मोठा धक्का बसला. स्पर्धेच्या इतिहासातील हा भारताचा सर्वात मोठा पराभव ठरल्याने संघरचनेत बदल होणार का, याबाबत चर्चा रंगू लागली आहे. या पार्श्वभूमीवर संजू सॅमसनचे नाव पुन्हा पुढे येत आहे.
 
 
Sanju Samson
 
सामन्यानंतर सहाय्यक प्रशिक्षक रायन टेन डोइशेट यांनी माध्यमांशी बोलताना सूचक विधान केले. गेल्या दीड वर्षात चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंवर विश्वास ठेवायचा की संघात बदल करून सॅमसनला संधी द्यायची, याबाबत विचार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. वरच्या फलंदाजी फळीत उजव्या हाताच्या फलंदाजाचा पर्याय संघासाठी रणनीतीच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरू शकतो, असेही त्यांनी नमूद केले. पुढील दोन सामने निर्णायक असल्याने या विषयावर गांभीर्याने विचार होणार असल्याचे संकेत त्यांनी दिले.
 
दरम्यान, तरुण सलामीवीर अभिषेक शर्मा अन्नातून झालेल्यात्रासामुळे पूर्ण तंदुरुस्त नव्हता, अशी माहितीही प्रशिक्षकांनी दिली. सलग तीन वेळा शून्यावर बाद झाल्याने त्याच्यावर मानसिक दबाव निर्माण झाल्याचे त्यांनी मान्य केले. मात्र हे कोणासाठीही सबब नसून संघाला परिस्थितीतून मार्ग काढावा लागेल, असे स्पष्ट करण्यात आले. या पराभवामुळे भारताचा उपांत्य फेरीकडे जाणारा मार्ग कठीण झाला आहे. त्यामुळे पुढील सामन्यांमध्ये संघ व्यवस्थापन महत्त्वाचे निर्णय घेण्याची शक्यता आहे. संजू सॅमसनला संधी मिळणार का, याकडे आता क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे.
Powered By Sangraha 9.0