राज्यातील पाेलिस कर्मचाऱ्यांची पदाेन्नतीने हाेणारी नियुक्ती रखडली

23 Feb 2026 15:26:58
अनिल कांबळे
नागपूर, 
promotion of police personnel राज्यातील 250 पाेलिस हवालदारांना पाेलिस उपनिरीक्षक पदावर तातडीने पदाेन्नती देण्यासाठी डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या दिवशी यादी जाहीर करीत महसूल संवर्ग मागण्यात आला हाेता. मात्र, जवळपास दीड महिन्यांपेक्षा जास्त अवधी उलटल्यानंतरही पाेलिस कर्मचारी उपनिरीक्षक पदावर पदाेन्नतीच्या प्रतीक्षेत आहेत.
 
 

पोलीस पदोन्नती  
 
राज्य पाेलिस विभागाकडून 2013 मध्ये पाेलिस उपनिरीक्षक पदासाठी घेतलेल्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या पाेलिस हवालदारांची माेठी संख्या आहे.त्यापैकी आतापर्यंत तीन ते चार हजार कर्मचाऱ्यांना पाेलिस उपनिरीक्षक पदावर पदाेन्नती देण्यात आली हाेती. गेल्या वर्षी 31 डिसेंबर 2025 राेजी आस्थापना विभागाच्या विशेष पाेलिस महानिरीक्षक सुप्रीया पाटील यादव यांनी 250 पाेलिस हवालदारांची यादी जाहीर केली. त्यात अवघ्या एका दिवसात तातडीने संवर्ग भरुन मागण्यात आला हाेता. त्यामुळे राज्यातील अडीचशे पाेलिस हवालदारांना आनंद झाला हाेता. पाेलिस कर्मचाऱ्यांनी महसूल संवर्ग भरुन दिला हाेता. नियमानुसार संवर्ग मागितल्यानंतर एका महिन्याच्या आत पदाेन्नतीसह नियुक्तीची यादी जाहीर हाेणे अपेक्षित हाेते. मात्र, पाेलिस हवालदारांना जवळपास दीड महिन्यांपेक्षा जास्त कालावधी उलटल्यानंतरही पदाेन्नती मिळण्याची प्रतीक्षाच आहे. मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाेलिस हवालदारांना पदाेन्नती देण्याबाबत सकारात्मकता दाखवली आहे. मात्र, पाेलिस महासंचालक कार्यालय आणि आस्थापना विभाग गृहमंत्र्यांच्या आदेशाकडे दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र आहे.
अनेकांच्या मनात पदाेन्नतीबाबत संभ्रम ?
आस्थापना विभागाने तातडीने महसूल संवर्ग मागितल्यानंतर पाेलिस कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले हाेते. मात्र, एवढे दिवस झाल्यानंतरही उपनिरीक्षक पदावर पदाेन्नती न दिल्यामुळे अनेकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. आस्थापना विभागातील लिपिक वर्गांना काही ‘अर्थपूर्ण’अपेक्षा आहेत का?, असा संशय निर्माण झाला आहे.
हवालदार बाशिंग बांधून तयार
राज्यातील 250 पाेलिस हवालदारांना महसूल संवर्ग मागविण्यात आले आहेत. त्यामुळे आता महिन्याभरात पदाेन्नतीने पाेलिस अधिकारी हाेणार, अशी अपेक्षा त्यांना हाेती. त्यामुळे हवालदारांनी पीएसआय पदासाठी लागणारे शूज, बेल्ट, कॅप आणि केनसह अन्य साहित्य घेऊन ठेवले.promotion of police personnel अधिकाऱ्यासाठी लागणारी वर्दीसुद्धा शिवून ठेवली आहे. सध्या पाेलिस हवालदार गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असल्याचे चित्र आहे.
Powered By Sangraha 9.0