शेकडो हेक्टरवरील रब्बी पिकांना फटका
चंद्रपूर,
Unseasonal rain in Chandrapur district हवामान विभागाने सोमवारी वादळी वार्यासह पावसाचा अंदाज वर्तवला होता. तो अंदाज खरा ठरला. सोमवारी दुपारच्या सुमारास जिल्ह्यातील काही भागात वादळी वार्यासह अवकाळी पाऊस बरसला. या पावसाचा रब्बी हंगामातील पिकांना फटका बसला आहे. जिल्ह्यातील चंद्रपूर महानगरासह घुग्घूस, पोंभूर्णा, सावली, मूल, ब्रम्हपुरी, चिमूर, राजुरा, वरोडा व सिंदेवाही तालुक्यात सोमवारी अवकाळी पावसाने हजेरी लावली. राजुरा येथे सायंकाळी शाळा, कार्यालय सुटायच्या वेळेवर एक तास मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. शेतात कापूस वेचणी सुरू असल्याने शेतमजुर व शेतकरी हैराण झाले. या पावसामुळे शेतकर्यांचे गहू, मिरची, चना, मुंग, भाजीपाला आदी पिकांचे नुकसान होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. शेतकर्यांनी तूर पिक कापून शेतात ठेवले असल्याने हातातोंडासी आलेला घास हिरवण्याची शक्यता आहे.
चिमूर तालुक्यातील भिसी परिसराला दुपारच्या सुमारास वादळी वार्यासह अवकाळी पावसाने झोडपले. काही नागरिकांच्या घरामध्ये, तर काहींच्या दुकानांमध्ये पाणी शिरले. तर अनेकांच्या घराच्या छतावरील साहित्य उडाले. वादळी वार्यासह झालेल्या पावसामुळे आंब्यांचा झाडावरील मोहर गळून पडला आहे. त्यामुळे आंबा उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच शेतकर्यांनी वाळविण्यासाठी खुल्या जागेवार ठेवलेली हळद ओली होऊन नुकसान झाले आहे.
Unseasonal rain in Chandrapur district वरोडा तालुक्यात सकाळपासून ढगाळ पसरले होते. सकाळी 8 वाजताच्या सुमारास काही भागात पावसाच्या सरी कोसळल्या. त्यानंतर उन्ह-सावलीचा लपंडाव सुरू होता. अशातच दुपारी 3 वाजताच्या सुमारास जोरदार वारे वाहू लागले आणि काही वेळातच पावसाने हजेरी लावली. तालुक्यातील शेगाव परिसरात जवळपास अर्धा तास जोरदार, तर माढेळी, नागरी परिसरात तुरळक पाऊस पडला. या परिसरात अचानकपणे आलेल्या पावसाने शेतकर्यांची चिंता वाढवली आहे. शेतकर्यांच्या हाती आलेल्या गहू, हरभरा पिकांचे नुकसान झाले आहे. ज्यांच्या शेतातील कापसाचा वेचा झाला नाही अशा शेतकर्यांच्या कापसाचेही नुकसान झाले आहे. सद्या रब्बी हंगामातील गहू, हरभरा ही पिके निघण्याच्या मार्गावर आहेत. तर काही शेतकर्यांची या पिकांची कापणी सुरू आहे. मात्र, याच दरम्यान अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने पिकांचे नुकसान होत आहे. खरीप हंगामातसुद्धा परतीच्या पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले होते. आता रब्बी हंगामात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे.
वातावरणात गारवा
रविवारी जिल्ह्याचे तापमान 35.2 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले होते. मात्र, हवामान खात्याच्या अंदाजाप्रमाणे सोमवारी अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.