वेध
Vehicle speed limit वाहन आज मानवाची मूलभूत गरज बनली आहे. पण याच वाहनांमुळे वाढत असलेले अपघातही चिंताजनक ठरले आहेत. शंभरपैकी 99 अपघात मानवी चुकांमुळे घडतात. यात वेगाने वाहन चालविणे हे प्रमुख कारण आहे. एसटी महामंडळाने अपघात घडू नये म्हणून आपल्या सर्वच वाहनांची वेगमर्यादा ताशी 60 ते 80 किलोमीटर यानुसार चक्क लॉक करून ठेवली आहे. परिणामी एसटीचा प्रवास सर्वात सुरक्षित ठरला आहे. मग एसटी आपल्या वाहनांची वेगमर्यादा लॉक करून ठेवते, त्याच धर्तीवर खाजगी वाहनांना मोकळे रान का? हाच मुद्दा आता ऐरणीवर आला आहे. त्याचा विचार करता प्रत्येक वाहनांची वेगमर्यादा आता लॉक करायची वेळ आलेली आहे. लोक शिकलेले असोत किंवा अशिक्षित ते नियम मोडण्यातच धन्यता मानतात. शिवाय कायद्यातील पळवाटा पाहता आरोपी चालकाला फाशी झालेले उदाहरण भारतात तरी उपलब्ध नाही. हे वास्तव पाहता भारत सरकारने स्वत: पुढाकार घेत कारखान्यातून रस्त्यावर येणाèया प्रत्येक वाहनांची वेगमर्यादा लॉक करण्याचे आदेश द्यायला हवेत. समजा एखाद्याला वेगमर्यादा लॉक केलेले वाहन नको असल्यास त्याच्याकडून दहा पट कर घेतला जावा. एवढेच नव्हे तर त्याच्या विम्याची रक्कमही तेवढ्याच पटीने वाढविण्यात यावी. ही मागणी अनेकांना हास्यास्पद वाटेल, पण हीच काळाची गरज आहे. भारतातील लोकांची मानसिकता भीतीयुक्त आदर राखणारी आहे. नागपूर जिल्ह्यातील कामठीत नाही का, भारतीय लष्कराच्या परिसरातून जाताना सैनिकांच्या धाकापोटी का असेना तिथे वाहन चालक हळूवारपणे वाहन चालवितात. परिणामी तिथे अपघात घडत नाहीत.
Vehicle speed limit मग इतरत्र हाच नियम लागू केल्यास मनुष्यबळाची गरज वाढेल. तेवढे मनुष्यबळ पुरविणे सरकारला शक्य नाही. अशावेळी वाहनांची निर्मिती करणाèया कंपन्यांनाच एसटी महामंडळाच्या धर्तीवर वेगमर्यादा लॉक करण्याचे निर्देश सरकारने द्यायला हवेत. ज्या कंपन्या याला जुमानणार नाहीत, त्यांच्या वाहन विक्रीवर देशात बंदी टाकावी. भारतात सन 2025 या वर्षात सुमारे 4 लाख 80 हजार अपघात झाले आहेत. याचा अर्थ दररोज 1315 अपघात घडले. महाराष्ट्रात सन 2025 मध्ये 36 हजार पेक्षा जास्त अपघात झाले. त्यात 15549 लोकांचा रस्ता अपघातात मृत्यू झाला आहे. देशातील बहुतांश गावात वाहनांच्या वेगावर नियंत्रण आणण्यासाठी गतिरोधक लावले जातात. पण दोन गतिरोधकांच्या मध्ये जो वेग वाढतो तोही जीवघेणा ठरत असतो. या स्थितीचा अभ्यास करता वाहनांची वेगमर्यादा लॉक झाल्यास चालकाने कितीही प्रयत्न केला तरी ती गाडी वायुवेगाने धावणारच नाही. तसे पाहता वायुवेगाने वाहन चालवून लोकांना चंद्रावर जायचे नसते. त्यांना तर रस्त्यावर थरार लोकांना दाखवायचा असतो. तो थरार पूर्ण होतो पण निष्पाप पादचारी मरतात, त्याचे काय? मेलेला माणूस केवळ एक असला तरी त्याच्यावर अवलंबून असलेले संपूर्ण कुटुंब उघड्यावर येते. एका चालकाच्या चुकीने दहा ते बारा लोकांचे आयुष्य बर्बाद होते.
Vehicle speed limit शिवाय आरोपी चालकाला मोठी शिक्षाही दिली जात नाही. तो तर तांत्रिक चूक होती असे सांगून पुन्हा दुसरा अपघात करायला मोकळाही होतो. तिकडे ज्याचा जीव गेला त्याला कधीच न्याय मिळत नाही. ही कटू वास्तविकता पाहता दुचाकी, चार चाकी आणि तिन चाकी सर्वच वाहनांची वेगमर्यादा लॉक करायची वेळ आलेली आहे. रस्ता ही सार्वजनिक मालमत्ता आहे. ती खाजगी मालमत्ता नाही. यामुळे रस्त्यावरून जाणाèयांसाठी कडक नियमावली यायलाच हवी. वेगमर्यादा लॉक झाल्यास वायुवेगाने होणारे अपघात थांबतील. वाहन हे सुरक्षित प्रवासाकरिता आहे. ते रस्यावरून चालणाèया पादचाèयांना चिरडून स्मशानभूमीत नेणारे नाहीत. पण प्रत्यक्षात आज वाहन हे निष्पाप लोकांना स्मशानभूमीत पोहोचविणारे यमदूत ठरले आहेत. अशा यमदूतरूपी वाहन चालविणाèया चालकांना धाकात ठेवायचे झाल्यास वेगमर्यादेला लॉक हाच सर्वोत्तम उपाय ठरू शकतो. याला काही लोक नक्कीच विरोध करतील. पण ज्यांच्या घरचा कर्ता पुरुष रस्ता अपघातात देवाघरी गेला, ते मात्र याला नक्कीच समर्थन देतील. शेवटी, रस्ता हा सार्वजनिक असल्याने त्यावरून चालणारी प्रत्येक व्यक्ती सुखरूप घरी जायलाच हवी. एसटी महामंडळाने वेगमर्यादा लॉक केल्याने त्यांचे काहीच बिघडलेले नाही. उलट त्यांचा प्रवास सुरक्षित झाला आहे. शिवाय बहुमूल्य इंधनाची नासाडीही थांबली आहे. मग आपलाही प्रवास सुरक्षित व्हावा, असे ज्यांना वाटत असेल त्यांनी नक्कीच वेगमर्यादेला लॉक करण्यासाठी पुढाकार घ्यावा. शेवटी ‘वेगाला आवरा जीवाला सावरा’ हाच फॉर्म्यूला आपल्याला पृथ्वीवर जीवंतपणीच स्वर्गसुख मिळवून देणारा ठरू शकतो.
- अनिल उमाकांत फेकरीकर
9881717859