कारंजा येथे विशाल हिंदू संमेलन उत्साहात
कारंजा,
जलसंवर्धन, वृक्षारोपण, प्लास्टिकमुक्त जीवनशैली आणि प्रदूषण रोखण्यासाठी वैयक्तिक स्तरावर आपल्याला प्रयत्न करावा लागेल. आपल्या मूळ संस्कृतीचा, भाषेचा, परंपरांचा आणि स्वदेशी वस्तूंचा अभिमान बाळगुण व पाश्चात्य अनुकरण सोडून भारतीय विचारांवर आधारित जीवनशैली जगणे आणि स्वतःच्या हक्कांसोबतच नागरी कर्तव्यांची जाणीव ठेवणे आवश्यक आहे. समाजासाठी जबाबदार नागरिक बनणे हे पंच परिवर्तन आजच्या काळाची गरज आहे. त्यामुळे सुसंस्कृत, समरस आणि समर्थ भारत निर्माण होण्यास मदत होईल, असे मार्गदर्शन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विदर्भ प्रांत कार्यवाह Atul Moghe अतुल मोघे यांनी केले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्धी वर्षानिमित्त सकल हिंदू समाजाच्या वतीने स्थानिक गुरुकुल पब्लिक स्कूल समोरील मैदानावर सकल विशाल हिंदू संमेलन व संतदर्शन सोहळ्यात रविवारी आयोजित हिंदू संमेलनात ते प्रमुख वते म्हणून बोलत होते. कार्यक्रमाला संत सखु माता, संत सयाजी महाराज, संत ज्ञानेश्वर पवार महाराज, राजयोगिनी उमादिदी, महानुभाव पंथाचे माधीराज महाराज, दंडारे महाराज, शाम नारायणदास महाराज, साध्वी रामप्रिया माई, आयोजन समितीचे अध्यक्ष अशोक पालीवाल उपस्थित होते.
अतुल मोघे यांनी संघावर आलेल्या बंदी काळातील संघर्ष, त्यातून झालेली वाढ व संघकार्याचे समाजरक्षणातील महत्त्व स्पष्ट केले. त्याचबरोबर संघाच्या शताब्दी वर्षाच्या निमित्ताने समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि राष्ट्र उभारणीसाठी पंच परिवर्तन ही पाच प्रमुख विषयाचे मार्गदर्शन केले. सामाजिक समरसता, कुटुंब प्रबोधन, पर्यावरण, स्व-आधारित जीवन, नागरी कर्तव्य या विषयाची माहिती दिली, जातीय भेदभाव नष्ट करून बंधुभाव, समानता आणि एकोपा निर्माण करून सर्व समाजाला समान मानण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. कुटुंबात संवाद वाढवणे, संस्कारक्षम वातावरण निर्माण करणे, पिढ्यानपिढ्या चालत आलेली मूल्ये टिकवून ठेवण्याची गरज असल्याचे Atul Moghe मोघे यांनी सांगितले.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ९ वाजता नऊ कुंडीय गायत्री महायज्ञाने झाली. दुपारी २ वाजता कलश यात्रा, शोभायात्रा व पालखी काढण्यात आली. दादाजी महाराज भजन मंडळ, संत लटारे महाराज भजन मंडळ, सावित्रीबाई फुले भजन मंडळ, गुरुदेव सेवा भजन मंडळ, अनुसया माता भजन मंडळ, सखु माता भजन मंडळ, नवदुर्गा भजन मंडळ व बलजीत सिंग भजन मंडळ यांचा समावेश होता. शोभायात्रेत राजीव गांधी मेमोरियल स्कूलच्या लेझीम पथक, बॅण्ड पथक, कलशधारी मुली व श्रीरामचंद्रांची आकर्षक झांकी सादर करण्यात आली. गुरुकुल पब्लिक स्कूलच्या ढोल पथकासह मोठ्या संख्येने मुली कलश यात्रेत सहभागी झाल्या. तसेच सनशाइन स्कूलच्या विद्यार्थिनी व शिक्षकांचाही उत्स्फूर्त सहभाग लाभला.
प्रारंभी वंदे मातरम् जानवी भस्मे हिने सादर केले. भारतमातेची भव्य रांगोळी व संघाच्या पंचपरिवर्तनावर आधारित रांगोळी आरती सरोदे व अंकिता बोडके यांनी साकारून विशेष आकर्षण ठरली. प्रास्ताविक अजय भोकरे यांनी केले. आभार राहुल पैठणे यांनी मानले. यशस्वीतेकरिता श्रीराम रात्र शाखेचे स्वयंसेवक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तालुका कार्यकारिणी सदस्यांनी परिश्रम घेतले.