मुंबई,
BJP's new executive committee announced भारतीय जनता पक्षाने मंगळवारी राज्यातील नव्या पदाधिकाऱ्यांची घोषणा केली. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन ही नावे जाहीर केली. मुख्य प्रवक्ता, उपाध्यक्ष, सरचिटणीस, चिटणीस, कोषाध्यक्ष तसेच विविध मोर्चांच्या अध्यक्षपदांच्या नेमणुका यावेळी घोषित करण्यात आल्या. प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर काही काळ निवडणूक आचारसंहितेमुळे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे कार्यकारिणी जाहीर करण्यास विलंब झाल्याचे चव्हाण यांनी सांगितले. राष्ट्रीय नेतृत्वाशी सविस्तर चर्चा करूनच या नेमणुका करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबिन, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तसेच इतर वरिष्ठ नेते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सल्लामसलत करूनच अंतिम निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.

पक्षाच्या घटनेनुसार आणि राज्यातील राजकीय परिस्थिती लक्षात घेऊन मर्यादित पदांवर सक्षम कार्यकर्त्यांची निवड करण्यात आल्याचे चव्हाण यांनी सांगितले. ज्यांना पदाची संधी मिळाली नाही, त्यांनाही विविध जबाबदाऱ्या देऊन पक्षकार्यात सहभागी करून घेतले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.नव्या नियुक्त्यांमध्ये नवनाथ बन यांची मुख्य प्रवक्ता म्हणून निवड झाली आहे. प्रदेश उपाध्यक्षपदी अतुल काळसेकर, भारती पवार, संजय कोरगे, संजय भेंडे, रामदास कडस, केशव उपाध्ये, गोपीचंद पडळकर, प्रिया शिंदे, सुजय विखे पाटील आणि अर्चना पाटील चाकूरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सरचिटणीसपदी निरंजन डावखरे, संजय कुटे, माधवी नाईक, राजेश पांडे, सुनिल राणे आणि योगेश सागर यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
चिटणीस म्हणून मंगेश चव्हाण, संजय कुटे, परिणय फुके, वर्षा डहाळे, संजय जगताप, अर्चना डेहणकर, रोहिणी नायडू, राम सातपुते, प्रविण घुगे, रेखा कुलकर्णी आणि भैरवी घाक यांची निवड करण्यात आली आहे. युवा मोर्चाच्या अध्यक्षपदी कृष्णराज महाडिक यांना संधी देण्यात आली असून महिला मोर्चाच्या अध्यक्षपदी चित्रा वाघ, तर इतर मागासवर्गीय मोर्चाच्या अध्यक्षपदी योगेश टिळेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाच्या कोषाध्यक्षपदी मिहिर कोटेचा यांची निवड झाली आहे. या नव्या नियुक्त्यांमुळे पक्ष संघटनात्मकदृष्ट्या अधिक बळकट होईल, असा विश्वास पक्ष नेतृत्वाने व्यक्त केला आहे.