विकासाच्या गप्पा भरभरून, पण स्मशानात मात्र उघडे आभाळ!

24 Feb 2026 18:51:43
अंत्यविधीवेळी डोक्यावरून गळते पाणी; अखेरच्या क्षणीही आप्तस्वकीयांची परवड

तिरोडा, 
जिथे माणसाचा शेवटचा प्रवास संपतो, जिथे आयुष्यभराची नाती अश्रूंमध्ये विरघळतात, त्या स्मशानभूमीत तरी किमान सन्मान, शांतता आणि मूलभूत सुविधा मिळाव्यात, ही प्रत्येकाची अपेक्षा असते. मात्र Cemetery in Tiroda तिरोडा येथील स्मशानभूमीतील शेडची अवस्था पाहता, मृत्यूनंतरही नागरिकांना अपमान आणि हालअपेष्टा सहन कराव्या लागत असल्याचे संतप्त चित्र समोर आले आहे. पावसात छपरातून टपटपणारे पाणी, उन्हात भाजून काढणारा मोडकळीस आलेला शेड, बसण्यासाठी बाकांची व्यवस्था नाही, स्वच्छतेचा पत्ता नाही आणि रात्रीच्या वेळी अंधारातच अंत्यविधी उरकावे लागतात-ही वस्तुस्थिती केवळ असुविधा नसून स्थानिक प्रशासनाच्या असंवेदनशीलतेचे जिवंत उदाहरण आहे.
 
 
tiroda
 
शोकाकुल कुटुंबीय अश्रू ढाळत उभे असताना त्यांच्या डोक्यावरून पाणी गळत असणे, वृद्ध आणि महिलांना उभे राहण्याचीही सोय नसणे-ही कोणत्या विकासाची कहाणी आहे? वर्षानुवर्षे ही दुरवस्था सर्वांनाच माहीत आहे. तरीही ठोस उपाययोजना का नाही? शहरात विकासकामांचे भूमिपूजन, फिती कापण्याचे सोहळे, मोठमोठ्या घोषणा-या सगळ्यांच्या गर्दीत Cemetery in Tiroda  स्मशानभूमीसारख्या अत्यावश्यक ठिकाणाकडे मात्र सातत्याने दुर्लक्ष का? अखेरचा प्रवास सन्मानाने पार पाडण्यासाठीही नागरिकांनी प्रशासनाच्या दारात हेलपाटे मारावे लागणे, ही लाजिरवाणी बाब नाही का? स्मशानभूमी ही केवळ एक जागा नाही; ती समाजाच्या संस्कारांची आणि सत्ताधार्‍यांच्या संवेदनशीलतेची कसोटी असते. मृत्यूसमयी तरी माणसाला सन्मान मिळायला हवा-ही मागणी राजकारणाची नाही, तर माणुसकीची आहे. तिरोडा स्मशानभूमीतील शेडची ही ‘घरघर’ प्रशासनाच्या कानावर कधी पडणार? की अजून किती अंत्यविधी या मोडकळीस आलेल्या शेडखालीच पार पाडावे लागणार? आज प्रत्येक नागरिकाच्या मनात एकच संतप्त प्रश्न घुमतो आहे. जिवंतपणी आश्वासने, आणि मृत्यूनंतर उपेक्षा-हा कोणता विकास?
Powered By Sangraha 9.0