देवरी ग्रामीण रुग्णालय व कवलेवाडा प्राथमिक आरोग्य केंद्राचा मुंबईत गौरव
गोंदिया,
Gondia : 'Arogya Ratna' award गोंदिया जिल्ह्याच्या आरोग्य क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीची राज्यस्तरावर दखल घेत देवरीतील ग्रामीण रुग्णालय आणि गोरेगाव तालुक्यातील कवलेवाडा प्राथमिक आरोग्य केंद्राला राज्यस्तरीय ‘वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्य रत्न पुरस्कार’ व ‘महाआरोग्य सन्मान 2026’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मुंबई येथील चर्चगेट परिसरातील यशवंतराव चव्हाण सभागृहात 22 फेब्रुवारी रोजी सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत आयोजित या कार्यक्रमात सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर आणि राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या हस्ते गौरवचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. राज्यातील उत्कृष्ट कार्य करणार्या आरोग्य संस्था, वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचार्यांचा यावेळी गौरव करण्यात आला. अतिदुर्गम भागात कार्यरत असलेल्या देवरी ग्रामीण रुग्णालयाने बाह्यरुग्ण व आंतररुग्ण सेवा, मेजर-मायनर शस्त्रक्रिया, प्रसूती व सिझेरियन सेवा तसेच आयुष्यमान भारत डिजिटल मिशनअंतर्गत उत्कृष्ट आरोग्य निर्देशक साध्य केले.
Gondia : 'Arogya Ratna' award वैद्यकीय अधीक्षक डॉ. गगन गुप्ता यांच्या नेतृत्वात वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स व कर्मचार्यांच्या एकत्रित प्रयत्नातून ही उल्लेखनीय कामगिरी साध्य झाली. पुरस्कार जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पुरुषोत्तम पटले व डॉ. गगन गुप्ता यांनी स्वीकारला. कवलेवाडा प्राथमिक आरोग्य केंद्राने 2025-26 या वर्षात प्रसूती सेवा, कुटुंबकल्याण पुरुष/स्त्री शस्त्रक्रिया तसेच विविध आरोग्य निर्देशकांमध्ये ग्रामीण भागात उत्कृष्ट कामगिरी नोंदवली. वैद्यकीय अधिकारी डॉ. स्नेहा भावे यांच्या नेतृत्वाखाली समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य सेविका-सेवक, फार्मासिस्ट, प्रयोगशाळा अधिकारी व आशा सेविकांच्या टीमवर्कमुळे हा राज्यस्तरीय सन्मान प्राप्त झाला. पुरस्कार जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभिजीत गोल्हार व डॉ. स्नेहा भावे यांनी स्वीकारला.
जिल्ह्याचा मान उंचावला
या दुहेरी राज्यस्तरीय सन्मानामुळे गोंदिया जिल्ह्याचा लौकिक राज्यभर झळकला आहे. मर्यादित साधनसामग्री व मनुष्यबळातही दर्जेदार व लोकाभिमुख आरोग्य सेवा देण्याचा आदर्श या संस्थांनी घालून दिला आहे. जिल्हाधिकारी प्रजित नायर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरुगानंम, जि. प. अध्यक्ष लायकराम भेंडारकर, उपाध्यक्ष सुरेश हर्षे तसेच आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकार्यांनी संबंधित संस्था व कर्मचार्यांचे कौतुक केले आहे.