पोलिस भरतीत 16 हजारांवर युवक-युवतींनी लावला दम

24 Feb 2026 13:20:53
अनिल कांबळे
नागपूर,
police recruitment राज्यभरात ११ फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या पोलिस भरती प्रक्रियेअंतर्गत नागपूर ग्रामीण पोलिस विभागाची मैदानी चाचणी यशस्वीरीत्या पार पडली. पुरुष उमेदवारांची परीक्षा ११ ते १९ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत, तर महिला उमेदवारांची परीक्षा २० ते २३ फेब्रुवारी २०२६ दरम्यान घेण्यात आली.
 

police re 
 
 
जिल्ह्यातील एकूण २७२ पदांसाठी राज्यभरातून १६ हजार १०७ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. भरती प्रक्रियेदरम्यान उमेदवारांच्या कागदपत्रांची प्राथमिक छाननी, जैवमितीय नोंदणी तसेच मैदानी परीक्षा अत्यंत कडक आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यात आली. संपूर्ण प्रक्रियेत सीसीटीव्ही देखरेख, व्हीडिओ रेकॉर्डिंग आणि आरएफआयडी (रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन) तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. कोणत्याही प्रकारच्या गैरप्रकारांना प्रभावी आळा घालण्यासाठी आणि उमेदवारांची ओळख निश्चित करण्यासाठी दोन वेळा जैवमितीय पडताळणी करण्यात आली.
 
मैदानी चाचणीत पुरुष उमेदवारांसाठी १६०० मीटर धावणे, तर महिला उमेदवारांसाठी ८०० मीटर धावणे यांसह १०० मीटर धावणे आणि गोळाफेक या टप्प्यांचा यशस्वीरीत्या समावेश होता. आरएफआयडी प्रणालीमुळे धावण्याची प्रक्रिया पूर्णतः पारदर्शक करण्यात आली. भरतीदरम्यान उमेदवारांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी पोलिस प्रशासनाने आवश्यक सोयी उपलब्ध करून दिल्या होत्या. मैदानावर मोफत बिस्किटे आणि ग्लुकोजची व्यवस्था करण्यात आली होती. बाहेरून आलेल्या उमेदवारांसाठी निवास व इतर मूलभूत सुविधांचीही सोय करण्यात आली होती. संपूर्ण प्रक्रियेदरम्यान पुरेसा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. ही संपूर्ण कार्यवाही ग्रामीणचे पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार, अपर पोलिस अधीक्षक अनिल म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पार पाडली.
Powered By Sangraha 9.0