शहरात भटया कुत्र्यांचा वाढता उपद्रव

24 Feb 2026 17:53:30
कारंजा लाड, 
problem of stray dogs शहरात भटया कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चवरे लाईन, कोष्टी पुरा, पोलिस स्टेशन परिसर, जैन मंदिर परिसर, सरकारी दवाखाना, मेन लाईन, सराफ लाईन, बसस्थानक परिसर, संतोषी माता कॉलनी, टिळक चौक, भारतीपुरा, मोठे राम मंदिर, जिजामाता चौक अशा अनेक भागांत मोकाट कुत्र्यांचे टोळके फिरत असल्याच्या तक्रारी सातत्याने पुढे येत आहेत.
 
 
dog
 
problem of stray dogs अशातच सोमवारी सकाळी पारस नगर परिसरात वृत्तपत्र विक्रेते मनोज राऊत यांच्यावर मोकाट कुत्र्यांनी हल्ला करून त्यांना जखमी केले. विशेषतः सकाळी शाळकरी मुले, जॉगिंग करणारे नागरिक, तसेच रात्री कामावरून परतणार्‍या महिला व ज्येष्ठ नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. काही ठिकाणी कुत्र्यांच्या चावण्याच्या घटनाही वाढल्या आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये अस्वस्थता आणि संताप वाढत आहे. ही समस्या केवळ एका परिसरापुरती मर्यादित नसून संपूर्ण शहरभर पसरलेली आहे. त्यामुळे याकडे केवळ तक्रार म्हणून न पाहता सार्वजनिक आरोग्य आणि सुरक्षेचा प्रश्न म्हणून गांभीर्याने पाहणे आवश्यक आहे. संबंधित यंत्रणेकडून वेळोवेळी निर्बिजीकरण व लसीकरण मोहिमा राबविणे अपेक्षित असते. मात्र सध्या तरी अशा ठोस आणि व्यापक मोहिमेचा अभाव जाणवत आहे. नगर परिषदेकडून या प्रश्नावर तातडीने सर्वेक्षण करून कुत्र्यांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी निर्बिजीकरण, लसीकरण व आवश्यक त्या उपाययोजना राबविणे गरजेचे आहे. तसेच नागरिकांनीही कचरा उघड्यावर न टाकता स्वच्छता राखणे, कुत्र्यांना अन्न देताना जबाबदारीने वर्तन करणे, या बाबींची काळजी घेणे आवश्यक आहे. शहरातील कायदा - सुव्यवस्था, नागरिकांचे आरोग्य आणि सुरक्षितता लक्षात घेता नगर परिषद प्रशासनाने विलंब न लावता संपूर्ण कारंजा शहरात विशेष मोहिम हाती घ्यावी, अशी सर्वसामान्य नागरिकांची मागणी आहे. तातडीने कृती आराखडा जाहीर करून अंमलबजावणी केली तरच नागरिकांना दिलासा मिळेल.
Powered By Sangraha 9.0