१२ तास विद्युत पुरवठा देण्याची मागणी
गोंदिया,
Sadak Arjunit: Mahavitaran कृषीपंपांना १२ तास वीज पुरवठा देण्यात येत असताना महावितरणकडून त्यात कपात करून ८ तास वीज पुरवठा देण्यात येत आहे. तेव्हा पुर्ववत १२ तास वीज पुरवठा देण्यात यावा या मागणीला घेऊन सडक अर्जुनी तालुक्यातील बोपाबोडी, माहूली व बिरी येथील सुमारे शेकडो शेतकर्यांनी मंगळवारी २४ फेब्रुवारी रोजी सडक अर्जुनी येथील महावितरणच्या उपविभागीय कार्यालयावर धडक देत उपकार्यकारी अभियंता यांना मागण्यांचे निवेदन दिले.
Sadak Arjunit: Mahavitaran सादर निवदेनानुसार यंदाच्या रब्बी हंगामात सडक अर्जुनी तालुक्यातील शेतकर्यांनी धान पिकासह मका व इतर पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड केली आहे. अशात शेतकर्यांच्या कृषी पंपांना १२ तास वीज पुरवठा केला जात असताना शेतकर्यांना कसलीच पूर्वसूचना न देता गेल्या ३ ते ४ दिवसापासून महावितरणतर्फे त्यात कपात करण्यात आली आहे. त्यामुळे आता कृषी पंपांना फक्त ८ तास वीज पुरवठा करण्यात येत आहे. परिणामी शेतपीक धोक्यात आले आहे. कृषीपंपांना १२ तास वीज पुरवठा न मिळाल्यास शेतकर्यांचे मोठे नुकसान होणार आहे. तेव्हा शेतकर्यांच्या कृषी पंपांना देण्यात येणारा वीज पुरवठा पुर्ववत १२ तास करण्यात यावा या मागणीला घेऊन तालुक्यातील बोपाबोडी, माहुली व बिरीसह परिसरातील गावातील शेकडो शेतकर्यांनी एकत्र येत मंगळवारी सडक अर्जुनी येथील महावितरणच्या उपविभागीय कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी उपकार्यकारी अभियंता यांना निवेदन देवून शेतीला १२ तास वीज पुरवठा देण्यात यावा अशी मागणी केली. प्रसंगी उपकार्यकारी अभियंता रेवतकर यांनी शेतकर्यांचे निवेदन स्विकारून किमान तीन दिवसपर्यंत १२ तास वीज पुरवठा करण्याचे आश्वासन दिले तर यानंतर वरिष्ठ अधिकार्यांशी चर्चा करून निवेदनाच्या मागणीनुसार विचार करू असे आश्वासित केले. निवेदन देतेवेळी बोपाबोडी येथील सरपंच निखिल मेश्राम,उपसरपंच गणेश कापगते, सिंदिपार येथील उपसरपंच विशाल पर्वते, शेतकरी भूमेश कापगते, प्रदीप कापगते, धनराज डोंगरवार, प्रशांत कापगते, हरिदास कापगते, रुपेश भुरे, विश्वजीत वासनिक, महेश मेश्राम, प्रमोद कापगते, तुषार कापगते, रमेश डोंगरवार, चैतन्य डोंगरवार, रामकृष्ण डोंगरवार, रवींद्र डोंगरवार, शांतीलाल लंजे, पवन बनसोड यांच्यासह शेकडो शेतकरी उपस्थित होते.
पोलिसांची मध्यस्थी ...
शेतकर्यांनी महावितरण कार्यालयावर धडक दिल्यानंतर तणावपुर्ण परिस्थितीची दखल घेत आंदोलनस्थळी पोलिसांना पाचारण करण्यात आले. यावेळी पोलिसांनी मध्यस्थी करून शेतकर्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. प्रसंगी शेतकर्यांनी तीन दिवसात कृषी पंपाचा विद्युत पुरवठा पुर्ववत करा अन्यथा पुन्हा कार्यालयासमोर मोठे आंदोलन करणार असा इशारा दिला.