नवी दिल्ली,
SpiceJet flight engine fails दिल्लीहून लेहकडे निघालेल्या स्पाइसजेटच्या प्रवासी विमानाला उड्डाणानंतर तातडीने परत फिरावे लागले. सुमारे दीडशे प्रवासी घेऊन जाणारे हे विमान इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आकाशात झेपावल्यानंतर एका इंजिनमध्ये बिघाड झाल्याचे वैमानिकांच्या लक्षात आले. परिस्थितीचा आढावा घेत सुरक्षिततेच्या दृष्टीने विमान पुन्हा दिल्लीकडे वळवण्यात आले. विमानाच्या सुरक्षित अवतरणासाठी विमानतळ प्रशासनाने तातडीची स्थिती जाहीर केली. वैद्यकीय पथके आणि अग्निशमन दल सज्ज ठेवण्यात आले होते. वैमानिकांच्या दक्षतेमुळे विमान सुरक्षितपणे उतरवण्यात यश आले. इंजिनमधील बिघाडाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून तांत्रिक पथकाकडून सविस्तर तपासणी केली जाणार आहे.

दरम्यान, सोमवारी रांचीहून दिल्लीकडे निघालेल्या रुग्णवाहिका विमानाचा झारखंडमधील चतरा जिल्ह्यात अपघात झाला. उड्डाणानंतर काही वेळातच हवाई नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटल्याची माहिती मिळाली आणि त्यानंतर विमान कोसळल्याचे स्पष्ट झाले. या दुर्घटनेत सात जणांचा मृत्यू झाला असून बचाव पथकांनी सर्व मृतदेह बाहेर काढले आहेत. दोन्ही घटनांमुळे हवाई सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.