जगण्याचे मरणमार्ग

24 Feb 2026 05:00:00
अग्रलेख...
 
 
agralekh nagpur गरज आणि हव्यास ही मानवी स्वभावाची दोन टोके जेव्हा एकमेकांशी तीव्र संघर्ष करू लागतात तेव्हा संस्कार, संस्कृती, माणुसकी, परंपरा आदी शब्द लाजेने तोंड लपवितात. ‘हे जीवन सुंदर आहे’ वगैरे विचार म्हणजे भरल्या पोटीच्या केवळ कविकल्पना वाटू लागतात. गरजेपोटी नाडलेल्यांचे जगणे आणि हव्यासापोटी गरजवंतांना नागविणाऱ्यांचे जगणे यांमधील संघर्ष हाच जगाचा खरा व्यवहारवाद वाटू लागतो आणि माणुसकी वगैरे कल्पना कधी खरोखरच अस्तित्वात तरी असतील का, अशी शंका येऊ लागते. खरे पाहता, माणुसकी हा माणसाचा जन्मजात स्वभावधर्म मानला जातो. तो काही मनावर घडविण्याचा संस्कार नव्हे. कारण मुळातच मन नावाचा वैशिष्ट्यपूर्ण असा एक अदृश्य अवयव माणसाला जन्मासोबत मिळालेला असल्याने, सारासार विचार करून योग्य आणि अयोग्यांतील योग्य ते निवडण्याची व त्यानुसार निर्णय घेऊन तशी कृती करण्याची क्षमता अन्य प्राण्यांहून मानवी मेंदूत अधिक विकसित झालेली असते. त्यामुळे माणुसकी ही माणसाची मक्तेदारी मानली जाते.
 
 

माणुसकी  
 
 
अन्य प्राण्यांतही विवेकबुद्धी असते. त्यानुसार ते जेव्हा वागतात, तेव्हा त्यांच्यातील माणुसकीचे दर्शन घडल्यास ते आश्चर्य मानले जाते. माणसाने माणुसकीने वागणे हा माणसाचा स्वभावधर्म मानला जात असल्याने त्याच्या विपरीत वागणाऱ्या माणसाचे वागणे मात्र ‘पाशवी’ म्हटले जाते. पण व्यवहारवाद वाढत चालला आणि माणसाच्या अंगीचे माणुसकीचे मूळ गुण दुर्मिळ होत चालले. तसे काही दर्शन माणसाच्या अंगी एखाद्या प्रसंगी घडलेच, तर ते आश्चर्य मानले जाऊ लागले आणि माणुसकीच्या वागण्याच्या बातम्या होऊ लागल्या. साधारणतः जेव्हा एखादी नैसर्गिक गोष्ट सहजपणे घडून जाते तेव्हा ती बातमी नसते. विशिष्ट हंगामात झाडांना येणारा मोहोर, फुलांनी बहरणाऱ्या वेली, कोकिळेचे कूजन या बाबी नैसर्गिक असल्याने झाडे मोहरली, वेली बहरल्या किंवा कोकिळांच्या सुरांनी रानावनांवर संगीताचा साज चढला तर त्यामुळे मनाला आनंद होत असला, तरी तसे घडणे अपेक्षितच असल्याने त्याचे काही वेगळेपण वाटत नाही. उलट, त्या त्या हंगामात तसे घडले नाही तर मात्र त्याचे आश्चर्य वाटून त्याची बातमी होते. माणुसकीबाबतही वास्तविक तसे व्हावयास हवे.
 
 
माणुसकी हा नैसर्गिक स्वभाव मानला जात असल्याने माणुसकीशून्य व्यवहारांचे आश्चर्य व्यक्त व्हायला हवे. प्रत्यक्षात व्यवहारवाद, चंगळवाद आणि आटत चाललेली माणुसकी यांमुळे माणसाच्या मनामध्ये होणारे बदल एवढे सहज वाटू लागले आहेत की, त्यातून घडणाऱ्या माणुसकीशून्य व्यवहारांचाच सर्वत्र सुळसुळाट सुरू झाल्याने माणुसकी आश्चर्याची बाब ठरू लागली असून पाशवी व्यवहारांच्या बातम्यांनी माणुसकीचे अस्तित्व संकटात आणले आहे.
आपल्या परीघापलीकडे नव्हे, तर अगदी आपल्या आसपास हाच धोका जिवंतपणे जगण्यावर आक्रमण करू लागल्याने जगण्यातल्या आनंदावर विरजण पडेल, असे चित्र दिवसागणिक भेसूर होताना दिसत आहे. जन्माला आल्यानंतर नैसर्गिकपणे मृत्यू येईपर्यंत जगणे हा माणसाचाच नव्हे, तर कोणत्याही सजीवाचा जन्मसिद्ध हक्क मानला जातो. नैसर्गिकपणे जगण्याच्या या हक्काची जपणूक व्हायला हवी, असे तीव्रतेने वाटण्याजोगे काही अस्वस्थ प्रकार अलिकडे बेसुमारपणे वाढत आहेत. महाराष्ट्रात स्त्री बीजांड विक्री नावाचे एक भयंकर प्रकरण समोर येत आहे. हा विषय नैतिक, कायदेशीर आणि सामाजिकदृष्ट्या संवेदनशील असल्याने त्याची गांभीर्याने चर्चा व्हावयास हवी. हे प्रकरण थेट माणुसकीलाच आव्हान देणारे असून गरज व हव्यास यांच्यातील संघर्षाचे भयावह टोक ठरले आहे. विज्ञानाच्या प्रगतीने वंध्यत्वावर मात करण्यासाठीचे मार्ग शोधले असले, तरी त्याचा व्यापार सुरू होतो तेव्हा विज्ञान हा माणुसकीला काळिमा लावणारा प्रकार ठरू शकतो. विज्ञानाचे रूपांतर जेव्हा व्यवहारवादी व्यवसायात होते, तेव्हा अनेक प्रश्न उभे राहतात. महाराष्ट्रातील काही महानगरांत आणि त्यांच्या आसपास फोफावणाèया शहरांत एका व्यावसायिक तंत्रज्ञानाची मोठी उलाढाल होत असते. ‘एआरटी’ म्हणजे, ‘असिस्टेड रीप्रॉडक्टिव टेक्नॉलॉजी’ असे या तंत्रज्ञानाचे नाव आहे. या तंत्रज्ञानाचा वापर करून वंध्यत्वावर मात करता येते आणि पालकत्वाच्या आस लागलेल्यांना अपत्यप्राप्तीचा मार्गदेखील या तंत्रज्ञानातून सुलभतेने मिळवून दिला जातो. कदाचित यामुळेच आर्थिक शोषणाचा नवा धंदा सुरू झाला असून अनेकदा जगण्याच्या संघर्षात मेटाकुटास आलेल्या व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील महिलांना पैशांचे आमिष दाखवून बीजांडदानासाठी प्रवृत्त केले जाते, असे उघडकीस आले आहे. या क्षेत्रातील दलालांची साखळी अशा गरजवंत महिलांच्या शोधात सक्रिय असते. ते अशा महिलांचा शोध घेतात आणि त्यांना पैशांचे आमिष दाखवून बीजांड विक्रीस प्रवृत्त करतात, असा हा धंदा सध्या फोफावला असून त्याची पाळेमुळे वेगवेगळ्या ठिकाणी खोलवर रुजलेली असावीत, अशी शंका व्यक्त होत आहे. ठाणे जिल्ह्यातील बदलापूर नावाचे शहर गेल्या काही वर्षांत अनेक प्रकरणांमुळे वादाच्या भोवèयात सापडले आहे. या शहरातच गेल्या काही दिवसांत या धंद्याचे बीभत्स रूप समोर येत असून बीजांड विक्रीच्या व्यवसायात गरजू महिलांना गुंतविले जात असल्याचे काही प्रकार उघडकीस आले आहेत. धंदेवाईक आणि दलालांचे एक व्यापक जाळे या धंद्यात मुरले असल्याचे काही महिलांवर झालेल्या कारवाईतून समोर येत आहे आणि सुमारे 20 महिला या जाळ्यात गुरफटून बीजांड विक्रीसाठीच्या आमिषाला बळी पडल्याचा संशय व्यक्त होत आहे.agralekh nagpur केवळ 20-25 हजारांच्या मोबदल्यात स्त्री बीजांडे खरेदी करून अपत्यहिनांकरिता मुलांचे उत्पादन करून देणारे कारखाने म्हणून अशा पीडित महिलांचे आयुष्य वेठीस धरले जात असल्याची विषण्ण जाणीव करून देणाèया या प्रकारामुळे माणुसकीच्या कल्पनेस मोठा धक्का बसला आहे. भारतीय समाजात स्त्रीदेह आणि मातृत्व या संकल्पना अत्यंत पवित्र मानल्या जातात. बीजांड विक्रीच्या या अनैतिक धंद्यामुळे या संकल्पनांच्या पावित्र्यालाच मोठा धक्का पोहोचला असून संस्कार, संस्कृती, परंपरांना खुंटीवर टांगणाèया धंदेवाईकपणापुढे माणुसकीने मान टाकली आहे. बीजांडाची विक्री हा जीवनाच्या मूलभूत अंशाचा व्यापार असल्याने नैतिकदृष्ट्या हा धंदा गुन्हेगारी स्वरूपाचाच ठरतो. त्यामुळे अशा गैरप्रकारास आळा घालण्याकरिता कठोर उपाययोजना आणि गुन्हेगारांवर कठोर कारवाई ही आजच्या महाराष्ट्राची सर्वात प्राधान्याची गरज ठरली पाहिजे. कारण बीजांड विकणारी स्त्री आणि अपत्यास जन्म देणारी माता यांच्यातील संघर्षात आता परंपरा जपली जाणार की व्यावसायिकता प्रभावी ठरणार, हा मुद्दा ऐरणीवर आला आहे. सुमारे चार वर्षांपूर्वी 2022 मध्ये तामिळनाडूतील इरोडमध्ये एका जन्मदात्रीने आपल्या 16 वर्षांच्या मुलीच्या वयाचे बनावट दाखले तयार करून आठ वेळा तिच्या बीजांडाची विक्री केल्याचे धक्कादायक प्रकरण उघडकीस आल्यानंतर देश हादरला होता. या प्रकरणानंतर तामिळनाडूतील चार इस्पितळांना टाळे ठोकण्यात आले आणि गुन्हेगारांवर कायदेशीर कारवाई झाली. त्यानंतर आता महाराष्ट्रात हाच प्रकार उघडकीस येत असल्याने अशा धंद्याचे एखादे आंतरराज्य किंवा आंतरराष्ट्रीय जाळे आहे का, ते कोठपर्यंत पसरलेले आहे, याचा तातडीने तपास व्हायला हवा. कारण मानवी देहाचा व्यापार मांडणारा हा प्रकार एखाद्या संघटित गुन्हेगारीचा आणि आंतरराष्ट्रीय टोळ्यांच्या कॉर्पोरेट गुन्हेगारी सिंडिकेटसारखा असल्याचा संशय व्यक्त होत आहे. सोयीच्या जागा हेरून हा धंदा केला जात असून विदेशी ग्राहकांसाठी भारतीय बीजांडांची बाजारपेठ असे याचे स्वरूप नाही ना, याचाही तपास व्हावयास हवा. अलिकडे समाजमाध्यमे, डार्क वेब नावाचे आभासी तंत्रज्ञान विकसित झाल्यापासून अशा धंद्याचे जाळे पसरविणे सहज शक्य होत असल्याने या माध्यमांवरही लक्ष ठेवावयास हवे.
केवळ बीजांड विक्रीच नव्हे, तर गरजवंतांच्या मूत्रपिंडांचा व्यापारदेखील चिंताजनक स्वरूप धारण करीत असल्याचे घडकीस येत आहे. गरजवंत, कर्जबाजारी शेतकरी आर्थिक आव्हानांपुढे गुडघे टेकून आपल्या गरजा भागविण्यासाठी किडनी विक्री करीत असल्याच्या बातम्या समाजाच्या परंपरा, संस्कृती, माणुसकी आदी संस्कारांना वाकुल्या दाखवत आहेत. ऊस तोडणी कामगार महिलांवर रोजगार बुडू नये म्हणून गर्भाशये काढून टाकण्याची वेळ येते, गरजवंत महिलांवर पैशांसाठी बीजांडे विकण्याची वेळ येते, गरजू, कर्जबाजारी शेतकèयांना आर्थिक संकटातून मार्ग काढण्यासाठी किडनी विकावी लागते, तेव्हा हे प्रकार केवळ आर्थिक गरजांवरील उत्तरे शोधणारे राहात नाहीत तर संस्कृती, परंपरा आणि माणुसकीच्या मूल्यांना आव्हाने देणारे ठरतात. मूल्ये, परंपरा आणि संस्कृतीचा èहास होत असतानाच्या काळाची संधी साधून धंदेवाईकपणापुढे मानवतेलाच नमविणाèया या प्रकारांची पाळेमुळे कायमची खणून काढावयास हवीत. अन्यथा माणसाच्या मूलभूत स्वभाव धर्माचे अस्तित्वच संपुष्टात येईल.
Powered By Sangraha 9.0