आता चेक ‘बाऊन्स’ झाल्यास दाखल होणार गुन्हा

25 Feb 2026 12:12:31
तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
mislead mahavitaran थकीत वीजबिलाची कारवाई टाळण्यासाठी न वटणारे धनादेश देत महावितरणची दिशाभूल करत वेळ मारून नेणाऱ्या वीज ग्राहकांवर गुन्हा दाखल करण्याच्या हालचालींना अमरावती परिमंडळात वेग देण्यात आला आहे, अशी माहिती मुख्य अभियंता अशोक साळुंके यांनी दिली.
 

चेक बाउंस  
 
महावितरणच्या लघुदाब वर्गवारीतील वीज ग्राहकांनी वीजबिल भरण्यासाठी दिलेल्या धनादेशांपैकी अमरावती परिमंडळात दरमहा सुमारे सरासरी 150 धनादेश अनादरीत (चेक बाऊन्स) होत असल्याचे दिसून येत आहे. महावितरणच्या असेही लक्षात आले की, काही वीज ग्राहकांनी दिलेल्या धनादेशावर चुकीची तारीख, खाडाखोड, चुकीची स्वाक्षरी, चुकीचे नाव, खात्यात पुरेशी रक्कम नसणे या कारणांवरून धनादेश अनादरित होत आहेत.
 
या प्रकारांमुळे वीजबिलाची वसुली न होता थकबाकीत वाढ झाली आहे. त्यामुळे महावितरणने मोहीम घेत धनादेश अनादर झालेल्या वीज ग्राहकांवर कारवाईच्या हालचालींना गती दिली आहे. यासोबतच धनादेश अनादरीत झाल्यास वीज ग्राहकांना प्रत्येक वीज बिलासाठी विलंब आकार अधिक जीएसटी करासह 885 रुपयांचा दंड संबंधित ग्राहकाच्या पुढील महिन्याच्या वीज बिलामध्ये इतर आकार म्हणून समाविष्ट करण्यात येतो.
 
तसेच अनादरीत एकाच धनादेशाद्वारे अनेक वीजबिलांचा भरणा केलेला असल्यास प्रत्येक वीजबिलासाठी स्वतंत्र दंडात्मक रक्कम लावण्यात येते. यासोबतच धनादेशाद्वारे वीजबिल भरण्याची सोय 6 महिन्यांसाठी निलंबित करण्याची कारवाई करण्यात येते.
फेब्रुवारी महिन्याच्या 22 दिवसांत परिमंडळात 27 लाख रुपयांचे 120 धनादेश अनादरीत झाले असून यात अमरावती जिल्ह्यातील 85 आणि यवतमाळ जिल्ह्यातील 35 धनादेशांचा समावेश आहे.
Powered By Sangraha 9.0