अमरावतीच्या बेपत्ता मुलीला तिरुचिरापल्लीतून आणले

25 Feb 2026 21:43:52
अमरावती, 
amravati-missing-girl : राजापेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा तमिळनाडूत शोध लावून तिला सुखरूप अमरावतीत आणण्यात अमरावती पोलिसांना यश आले. मुलीला तिच्या आईच्या ताब्यात देण्यात आले. आईसोबत झालेल्या भांडणातून संताप आल्याने ती निघून गेली होती.
 
 

JHK 
 
 
 
बहलोलपूर परिसरातील सरिना अज्जू पवार (वय ५० वर्ष) यांनी १६ फेब्रुवारीला तक्रार दिली होती की, तिची १७ वर्षीय मुलगी आदेशा राजापेठ येथील होप हॉस्पिटलमधून कोणालाही न सांगता निघून गेली आहे. त्यानुसार राजापेठ पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. वरिष्ठ पोलिस निरीक्षक पुनीत कुलट यांनी या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक विपुल हुलावले यांच्याकडे सोपविला. तांत्रिक तपासादरम्यान मुलगी तमिळनाडूतील कोयंबटूर येथे असल्याची माहिती मिळाली. तत्काळ पोलिस पथक तेथे रवाना झाले. मात्र पोलिसांची चाहूल लागताच मुलगी तेथून निघून गेल्याचे समोर आले. पुढील तांत्रिक तपासात ती चेन्नई एग्मोर एक्सप्रेसने तिरुचिरापल्लीकडे जात असल्याचे निष्पन्न झाले. राजापेठ पोलिसांनी तात्काळ तिरुचिरापल्ली रेल्वे स्थानकावरील जीआरपीशी संपर्क साधून मुलीचा फोटो पाठविला व तिला ताब्यात घेण्याची विनंती केली. त्यांनी तत्परता दाखवत मुलीला सुरक्षित ताब्यात घेतले.
 
 
त्यानंतर अमरावती पोलिस पथकाने तेथे जाऊन चौकशी केली असता, आईशी झालेल्या वादामुळे रागाच्या भरात घर सोडल्याचे मुलीने सांगितले. कायदेशीर प्रक्रियेनुसार मुलीला तिरुचिरापल्ली येथील बालकल्याण समितीसमोर हजर करण्यात आले. आवश्यक औपचारिकता पूर्ण केल्यानंतर २२ फेब्रुवारी रोजी पोलिस पथक तिला अमरावतीत घेऊन आले आणि तिच्या आईच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई पोलिस आयुक्त राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक पुनीत कुलट यांच्या नेतृत्वात पोलिस उपनिरीक्षक विपुल हुलावले, मिलिंद हिवरे, अमित बकातवार, प्रशांत बेलोरकर, भाग्यश्री पालवदे व सुषमा आठवले यांनी केली.
Powered By Sangraha 9.0