अर्जुनी मोर,
rajkumar-badole : स्थानिक आ. राजकुमार बडोले यांनी महाराष्ट्र विधान सभाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात १८ ते ४० वयोगटातील महिलांमध्ये वाढत्या गर्भाशयाच्या कर्करोगाच्या प्रमाणाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करत सभागृहाचे लक्ष वेधले. महिलांमध्ये आढळणार्या प्रमुख कर्करोगांपैकी गर्भाशयाचा कर्करोग हा एक महत्त्वाचा आजार असून, योग्य वेळी प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्यास तो टाळता येऊ शकतो. एचपीव्ही (ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस) लस प्रभावी असतानाही ती सर्वसामान्य महिलांपर्यंत पोहोचत नसल्याची खंत आ. बडोले यांनी व्यक्त केली. विशेषतः ग्रामीण व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांमध्ये जनजागृतीचा अभाव आणि आर्थिक अडचणींमुळे लसीकरण होत नसल्याने रुग्णसंख्या वाढताना दिसत असल्याचे त्यांनी नमूद केले.

शासनाने एचपीव्ही लस सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये मोफत उपलब्ध करून द्यावी, जेणेकरून कोणतीही महिला केवळ आर्थिक विवंचनेत या प्रतिबंधात्मक लसीपासून वंचित राहणार नाही, अशी मागणी त्यांनी केली. तसेच ग्रामीण भागात कर्करोगाचे निदान बहुतेक वेळा तिसर्या टप्प्यात होत असल्याने उपचारास उशीर होतो. यासाठी प्रत्येक जिल्ह्यात ‘कर्करोग स्क्रीनिंग अँड डिटेक्शन’ मोबाईल व्हॅन उपलब्ध करून नियमित तपासणी मोहीम राबविण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली. महिलांचे आरोग्य सुरक्षित ठेवणे ही शासनाची प्राथमिक जबाबदारी आहे. वेळेत लसीकरण आणि नियमित तपासणी केल्यास गर्भाशयाच्या कर्करोगावर प्रभावी नियंत्रण मिळवता येऊ शकते, असे मत आ. बडोले यांनी सभागृहात व्यक्त केले. त्यांच्या या प्रश्नामुळे महिला आरोग्याचा विषय अधिवेशनाच्या केंद्रस्थानी आला असून, शासनाने याबाबत सकारात्मक व ठोस निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.