अमरावती,
scholarship-exam-format : राज्यात २२ फेब्रुवारीला झालेल्या इयत्ता पाचवी आणि आठवी शिष्यवृत्ती परीक्षेतील प्रश्नांच्या काठिण्यपातळी बाबत विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. विद्यार्थ्यांच्या भाषा आणि गणित विषयांचे प्रश्न वयोगट व अभ्यासक्रमाच्या तुलनेत अधिक कठीण असल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे. या पृष्ठभूमीवर परीक्षेच्या स्वरूपात काळानुरूप बदल करण्याची विनंती प्रहार शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष महेश ठाकरे यांनी शालेय शिक्षणमंत्री व महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांच्याकडे केली आली आहे.

शिष्यवृत्ती परीक्षा भाषा, गणित, बुद्धिमत्ता चाचणी अशा विषयांची होते. पाचवीच्या परीक्षेसाठी साधारण सव्वासहा लाख, तर आठवीच्या परीक्षेसाठी पावणेचार लाख विद्यार्थी बसले होते. शिष्यवृत्ती परीक्षा ही विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेचे, संकल्पनात्मक आकलनाचे व तार्किक विचारशक्तीचे मूल्यमापन करणारी महत्त्वाची प्रक्रिया आहे. ग्रामीण व सामाजिकदृष्ट्या वंचित घटकांतील विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षाकेवळ आर्थिक मदत नसून, शैक्षणिक प्रगतीचे साधन आहे. निर्धारित निकषांनुसार प्रश्नपत्रिका ३० टक्के सोपी, ४० टक्के मध्यम व ३० टक्के कठीण असायला हवी. मात्र, या प्रश्नपत्रिकेची काठिण्यपातळी ही अधिक होती, असा दावा करण्यात आला आहे. विशेषतः पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रश्नांची लांबी, उपप्रश्नांची संख्या, संवाद व कवितांतील उतार्यांची जटिलता ही त्यांच्या आकलन क्षमतेपेक्षा अधिक असल्याचे नमूद करण्यात आले आहे. काही ठिकाणी अभ्यासक्रमाबाहेरील प्रश्न विचारण्यात आले आहे. त्यामुळे परीक्षा गुणवत्तेचे वस्तुनिष्ठ मूल्यमापन करण्याऐवजी विद्याथ्यर्थ्यांसाठी मानसिक ताणाचे कारण ठरल्याची भावना व्यक्त होत आहे.
विद्यार्थी वर्षभर विविध प्रश्नसंच आणि संदर्भ पुस्तकांच्या आधारे तयारी करतात. मात्र, प्रत्यक्ष प्रश्नपत्रिकेची धाटणी त्याच्याशी सुसंगत नसल्याचे दिसून आले. मर्यादित संदर्भ वाचन असलेल्या विद्यार्थ्यांना अवघड सामान्यज्ञान, अपरिचित म्हणी-वाक्प्रचार आणि बहुपदरी प्रश्नांमुळे वेळ अपुरा पडल्याचेही नमूद करण्यात आले आहे. अशाच पद्धतीने आठवीच्या प्रश्नपत्रिकांची काठिण्यपातळी होती, असे पालकांनी सांगितले.
कठीण प्रश्नपत्रिकांमुळे न्यूनगंड, निराशा
शैक्षणिक मानसशास्त्राच्या दृष्टीने मूल्यमापन हे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवणारे आणि शिकण्याची प्रेरणा दृढ करणारे असावे; परंतु अधिक कठीण प्रश्नपत्रिकांमुळे विद्यार्थ्यांमध्ये भीती, न्यूनगंड व निराशा निर्माण होण्याची शक्यता आहे. केवळ बहुपर्यायी प्रश्नांऐवजी आकलन, विश्लेषण व समस्या सोडवण्याच्या क्षमतेचे मूल्यमापन करणार्या प्रश्नप्रकारांचा संतुलित समावेश करावा. प्रश्नपत्रिका तयार करताना अनुभवी शिक्षक, शिक्षणतज्ज्ञ व शैक्षणिक मानसशास्त्रज्ञांचा सहभाग असावा. त्याचप्रमाणे अभिप्राय संकलन व पुनरावलोकनाची पारदर्शक यंत्रणा विकसित करावी,’ अशी मागणी प्रहार शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष महेश ठाकरे यांनी शिक्षणमंत्री नामदार दादाजी भुसे व परीक्षा परिषदेचे आयुक्त यांना निवेदनाद्वारे केली आहे.
काठिण्यपातळी अधिक असते
परीक्षा म्हटल्यावर प्रश्नांची काठिण्यपातळी कमी-जास्त होते. त्यातही शिष्यवृत्ती परीक्षा ही इयत्तानिहाय परीक्षांसारखी सामान्य परीक्षा नाही. त्यामुळे या परीक्षेतील प्रश्नांची काठिण्यपातळी अधिक असते. या परीक्षेला राज्यातून मोठ्या संख्येने विद्यार्थी बसतात. यातील काही विद्यार्थ्यांना प्रश्न कठीण वाटू शकतात. याचा अर्थ सर्व विद्यार्थ्यांना काठिण्यपातळी अधिक वाटली, असे होत नाही.
डॉ. नंदकुमार बेडसे
अध्यक्ष, राज्य परीक्षा परिषद