तभा वृत्तसेवा
दारव्हा,
sanjay-rathod : श्रीक्षेत्र धामणगाव देव येथे परमहंस भगवान मुंगसाजी माऊली यांच्या 68 व्या पुण्यतिथीनिमित्त मंगळवार, 24 फेब्रुवारी रोजी लाखो भाविकांच्या उपस्थितीत भव्य व भक्तिमय सोहळा पार पडला. ‘माऊली, माऊली, जय मुंगसाजी माऊली’ या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. राज्याच्या विविध भागांतून आलेल्या शेकडो दिंड्यांमुळे धामणगाव देवला जणू पंढरपूरचे स्वरूप आले होते.
पहाटेपासूनच दर्शनासाठी भाविकांच्या लांबलचक रांगा लागल्या होत्या. मंदिर परिसराला आकर्षक फुलांची सजावट, रंगीबेरंगी रांगोळ्या आणि रोषणाईने सजविण्यात आले होते. माऊलीच्या रथयात्रेत सहभागी होण्यासाठी सकाळपासूनच दिंड्यांनी रांगा लावल्या होत्या. पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते पहाटे 5 वाजता मुख्य दरबारात माऊलींचा अभिषेक व बंगळीचे विधीवत पूजन करण्यात आले. त्यानंतर पारंपरिक पद्धतीने सकाळी 8 वाजता रथपूजन करून भव्य मिरवणुकीला प्रारंभ झाला. यावेळी जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष राहुल ठाकरे उपस्थित होते.
‘धामणगावीचा राणा मुंगसाजी देव’ अशा जयघोषात नाचत गात भाविकांनी उत्सवात सहभाग घेतला. तसेच येणाèया भाविकांसाठी मंदिर परिसरात महाप्रसादाचे आयोजनही सामाजिक संस्थांकडून करण्यात आले होते. चिंचमंदिर परिसरात माऊलीच्या पुण्यतिथीनिमित्त दरवर्षी भरत असलेल्या यात्रा महोत्सवाचाही भाविकांनी आनंद घेतला.
माऊलीच्या दर्शनासाठी होणाèया गर्दीची पूर्वकल्पना असल्याने पोलिस विभागाकडूनही चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दरवर्षीप्रमाणे यंदाही मुंगसाजी माऊलींच्या पुण्यतिथी सोहळ्याने ऐतिहासिक उंची गाठली असून लाखो भक्तांच्या उपस्थितीमुळे संपूर्ण परिसर भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात न्हाऊन निघाला होता.