राष्ट्रपतींच्या ताफ्यासमोर कुत्रा; शेगावमध्ये क्षणभर तणाव

25 Feb 2026 12:38:22
शेगाव,
Dog in front of the President's motorcade द्रौपदी मुर्मू यांच्या शेगाव दौऱ्यादरम्यान एक अनपेक्षित प्रसंग घडल्याने काही क्षण तणावाचे वातावरण निर्माण झाले. बुलढाणा जिल्ह्यातील श्री संत गजानन महाराज मंदिरातयेथे दर्शन आटोपल्यानंतर राष्ट्रपतींचा ताफा मंदिर परिसरातून बाहेर पडत असताना अचानक एक भटका कुत्रा वाहनांच्या दिशेने धावत आला. राष्ट्रपतींच्या वाहनासमोरच तो आल्याने सुरक्षारक्षक आणि पोलिसांची क्षणभर धावपळ उडाली.
 
 
Dog in front of the President
संग्रहित फोटो 
 
या दौऱ्यासाठी मंदिर परिसरात आणि ताफ्याच्या संपूर्ण मार्गावर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. स्थानिक पोलीस, विशेष सुरक्षा पथके तसेच प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी तैनात होते. तरीही सुरक्षाव्यवस्थेला छेद देत प्राणी थेट वाहनांच्या रांगेत शिरल्याने काही काळ गोंधळाचे चित्र निर्माण झाले. मात्र सुरक्षा यंत्रणा तात्काळ सतर्क झाली आणि कुत्र्याला सुरक्षितपणे बाजूला हटवत ताफा विनाविघ्न पुढे रवाना करण्यात आला. सुदैवाने कोणतीही दुर्घटना घडली नाही.
 
 
दरम्यान, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या या भेटीमुळे शेगाव नगरीत ऐतिहासिक क्षण अनुभवायला मिळाला. देशाच्या राष्ट्रपतींनी प्रथमच संत गजानन महाराजांच्या पवित्र स्थळी भेट देत समाधीचे दर्शन घेतले. मंदिर संस्थानच्या वतीने त्यांचे पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले. त्यांनी विधिवत पूजा-अर्चा केली तसेच आरतीतही सहभाग घेतला. या प्रसंगी मंदिर परिसरात भाविकांचा उत्साह ओसंडून वाहत होता. राष्ट्रपतींच्या आगमनामुळे बुलढाणा जिल्ह्याच्या धार्मिक आणि सांस्कृतिक ओळखीला नवे अधोरेखन मिळाले. प्रशासनाने काटेकोर नियोजन करत दौरा सुरळीत पार पाडला असला, तरी ताफ्यासमोर घडलेल्या घटनेमुळे सुरक्षा व्यवस्थेबाबत चर्चा रंगू लागली आहे. तरीही हा दिवस जिल्ह्यासाठी अभिमानाचा आणि इतिहासात नोंद घेण्यासारखा ठरला आहे.
Powered By Sangraha 9.0