ब्रूकचा विक्रम, इंग्लंड अव्वल; भारतासह अनेक संघांचे भविष्य अधांतरी

25 Feb 2026 10:46:12
कोलंबो,
England in the semi-finals २०२६ च्या टी-२० विश्वचषकात इंग्लंडने उपांत्य फेरीत सर्वप्रथम प्रवेश मिळवला आहे. सुपर आठ टप्प्यात पाकिस्तानवर विजय मिळवत इंग्लंडने आपले स्थान निश्चित केले. पाकिस्तानने दिलेले १६५ धावांचे आव्हान कर्णधार हॅरी ब्रूकच्या शानदार शतकाच्या जोरावर इंग्लंडने दोन गडी राखून पार केले. टी-२० विश्वचषकाच्या इतिहासात कर्णधार म्हणून शतक झळकावणारा ब्रूक हा पहिलाच खेळाडू ठरला. याआधी इंग्लंडने श्रीलंकेलाही त्यांच्या मैदानावर पराभूत केले होते.
 
 
 
England in the semi-finals
 
दरम्यान, उर्वरित तीन उपांत्य फेरीच्या जागांसाठी चुरस वाढली आहे. सुपर आठमधील कोणताही संघ अद्याप अधिकृतरीत्या स्पर्धेबाहेर गेलेला नाही. पाकिस्तानचे भवितव्य अजूनही जिवंत आहे. श्रीलंकेविरुद्धचा अखेरचा सामना त्यांच्यासाठी निर्णायक ठरणार आहे. मात्र त्याचबरोबर न्यूझीलंडच्या निकालावरही त्यांना अवलंबून राहावे लागेल. न्यूझीलंडने दोन्ही सामने जिंकले तर त्यांचा मार्ग मोकळा होईल, परंतु एखादा पराभव झाल्यास गुणफरकाचा मुद्दा महत्त्वाचा ठरेल.
 
श्रीलंकेलाही उर्वरित सामने जिंकून इतर निकालांची प्रतीक्षा करावी लागेल. दक्षिण आफ्रिकेने भारतावर मोठा विजय मिळवून आपली स्थिती मजबूत केली आहे. वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वेविरुद्धचे सामने जिंकल्यास त्यांना पुढील फेरी गाठणे सोपे जाईल. वेस्ट इंडिजची परिस्थितीही जवळपास तशीच असून उर्वरित विजय आवश्यक आहेत. झिम्बाब्वे अजूनही शर्यतीत आहे, परंतु त्यांना भारत आणि दक्षिण आफ्रिकेसारख्या बलाढ्य संघांविरुद्ध विजय मिळवावा लागेल. भारताची स्थिती सध्या सर्वात गुंतागुंतीची आहे. दक्षिण आफ्रिकेकडून मोठ्या फरकाने पराभव झाल्याने त्यांचा गुणफरक घसरला आहे. आता उर्वरित सामने जिंकून गुणफरक सुधारावा लागणार आहे. काही प्रमाणात इतर संघांच्या निकालांवरही भारताचे भविष्य अवलंबून असेल. अशा परिस्थितीत सुपर आठमधील प्रत्येक सामना अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे आणि उपांत्य फेरीसाठीची स्पर्धा अधिकच रंगतदार बनली आहे.
Powered By Sangraha 9.0