४६ हजारांहून अधिक शेतकरी कर्जमाफीच्या उंबरठ्यावर

25 Feb 2026 19:45:06
गोंदिया,
farmer-loan-waiver-gondia : पाच वर्षांपासून नापिकी, वाढते खत-बियाण्यांचे दर आणि बाजारातील अनिश्चिततेशी दोन हात करत कर्जाच्या विळख्यात अडकलेल्या गोंदिया जिल्ह्यातील हजारो शेतकर्‍यांच्या आयुष्यात आता आशेची एक किरण दिसू लागली आहे. कर्जमाफी योजनेअंतर्गत तब्बल ४६ हजार ६०३ शेतकरी लाभासाठी पात्र ठरण्याची शक्यता व्यक्त होत असून, तब्बल २८९ कोटी १६ लाख रुपयांच्या थकबाकीवर सरकारचा ‘माफीनामा’ उमटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. प्रशासनाने या प्रक्रियेला वेग देत सहकारी बँका व सेवा सहकारी संस्थांकडून मागील पाच वर्षांतील पीक कर्ज आणि मुदत कर्जाची सविस्तर माहिती मागविली आहे. शासनाच्या संकेतस्थळावर माहिती अपलोड करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून, अंतिम टप्प्यातील पडताळणीही वेगाने सुरू आहे.
 
 

g 
 
 
 
वर्षानुवर्षे व्याजाच्या ओझ्याखाली दबलेल्या शेतकर्‍यांसाठी ही कर्जमाफी म्हणजे केवळ आर्थिक सवलत नाही, तर मानसिक दिलासाही ठरणार आहे. त्यात प्राथमिक आकडेवारीनुसार, पात्र शेतकर्‍यांकडे सुमारे १९० कोटी रुपये मूळ कर्ज तर उर्वरित रक्कम व्याजाची थकबाकी आहे. दरम्यान, वेळेत माहिती अपलोड न झाल्यास लाभार्थ्यांची नावे वगळली जाण्याची शक्यता असल्याने संबंधित अधिकार्‍यांना विशेष सूचना देण्यात आल्या आहेत. तालुकानिहाय पाहता गोंदिया तालुक्यातील ११ हजार ४७६ शेतकरी थकीत असून गोरेगाव ५५४३ शेतकरी, आमगाव ३९७६, तिरोडा १० हजार ११९, अर्जुनी मोरगाव ४४१५, देवरी व सडक अर्जुनी ८९१८ तर सालेकसा तालुक्यातील २१५६ शेतकरी थकीत असून ते पात्र ठरण्याची शक्यता आहे. दरम्यान, आधार कार्ड, बँक खाते क्रमांक, कर्ज खात्याचा तपशील आणि पीक नोंद यांसारखी आवश्यक कागदपत्रे सेवा सहकारी संस्थांकडे जमा करण्याचे काम शेवटच्या टप्प्यात आले आहे. गावागावांत शेतकरी कागदपत्रांच्या फाईली हातात घेऊन संस्थांकडे धाव घेत असल्याचे चित्र दिसत आहे.
 
 
सततची नापिकी, पावसाची अनिश्चितता, वाढलेला उत्पादन खर्च आणि बाजारातील चढउतार यामुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या खचला होता. अनेकांनी कर्ज फेडण्यासाठी दागिने गहाण ठेवले, तर काहींनी शेतीतील गुंतवणूक थांबवली. अशा परिस्थितीत ही कर्जमाफी योजना म्हणजे ‘नवा श्वास’ ठरण्याची चिन्हे आहेत. कर्जाचा डोंगर हलका झाला, तर शेतकरी पुन्हा नव्या जोमाने शेतीत उभा राहील, नव्या बियाण्यांवर, सिंचनावर आणि आधुनिक तंत्रज्ञानावर गुंतवणूक करेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. आता सर्वांचे लक्ष शासनाच्या अधिकृत घोषणेकडे लागले असून, हजारो कुटुंबांच्या आशा या निर्णयावर टिकून आहेत.
 
 
पिक कर्जाची उचल करणार्‍या शेतकर्‍यांनी जवळील बँका व सेवा सहकारी संस्थांकडे आधार कार्ड, बँक खाते क्रमांक, कर्ज खात्याचा तपशील देवून मुदतीत केवायसी करून घ्यावी.
- अर्चना माळवे
जिल्हा उपनिबंधक, गोंदिया
Powered By Sangraha 9.0