जेरुसलेम,
israel-parliament-lit-up-in-tricolor भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इस्रायल दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर तेथे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या निमंत्रणावरून मोदी दोन दिवसीय अधिकृत भेटीसाठी इस्रायलला रवाना झाले आहेत. या भेटीचे औचित्य साधत इस्रायलच्या संसदेची इमारत ‘नेसेट’ भारतीय तिरंग्याच्या रंगांनी उजळवण्यात आली. संसदेचे अध्यक्ष अमीर ओहाना यांनी सामाजिक माध्यमांवर याचे छायाचित्र शेअर करत हा सन्मान भारताशी असलेल्या दृढ मैत्रीचे प्रतीक असल्याचे म्हटले आहे.
इस्रायलमधील प्रमुख वृत्तपत्रे आणि माध्यमांनीही या दौऱ्याला मोठे महत्त्व दिले आहे. नामांकित दैनिक जेरूसलम पोस्ट ने पहिल्या पानावर विशेष मथळ्यासह मोदींचे स्वागत केले. israel-parliament-lit-up-in-tricolor हिंदी आणि हिब्रू भाषेत ‘नमस्ते’ असा उल्लेख करत भारत-इस्रायल संबंध नव्या टप्प्यात प्रवेश करत असल्याचे वृत्तपत्राने नमूद केले. दोन्ही देशांच्या प्राचीन संस्कृती आज आधुनिक आणि प्रभावी रणनीतिक भागीदार म्हणून उभ्या राहत असल्याची चर्चा इस्रायली माध्यमांत रंगली आहे.
या भेटीदरम्यान द्विपक्षीय संबंधांना ‘विशेष रणनीतिक भागीदारी’चा दर्जा देण्यावर भर दिला जाणार आहे. संरक्षण, सुरक्षा, जलव्यवस्थापन, शेती तसेच विज्ञान-तंत्रज्ञान या क्षेत्रांत सहकार्य अधिक मजबूत करण्यावर दोन्ही नेत्यांमध्ये सविस्तर चर्चा होणार आहे. israel-parliament-lit-up-in-tricolor संकटकाळात परस्परांना मदत करण्याची भूमिका आणि अत्याधुनिक संरक्षण प्रणाली संयुक्तरीत्या विकसित करण्याबाबतही सकारात्मक भूमिका घेतली जाऊ शकते, अशी माहिती सूत्रांकडून दिली जाते.
दौऱ्यात मोदी इस्रायलचे राष्ट्रपती इसाक हरजोग यांची भेट घेणार असून ‘नेसेट’ला संबोधितही करणार आहेत. पंतप्रधान नेतन्याहूंसोबत व्यापार, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष क्षेत्रातील प्रगतीचा आढावा घेतला जाईल. कठीण काळात एकमेकांच्या पाठीशी उभे राहिलेल्या भारत आणि इस्रायलच्या नात्याला या दौऱ्यामुळे औपचारिक आणि अधिक बळकट स्वरूप मिळणार असल्याचे मानले जाते. या भेटीमुळे केवळ आर्थिक संबंधांना चालना मिळणार नाही, तर जागतिक पातळीवरही दोन्ही देशांची भागीदारी अधिक ठळकपणे अधोरेखित होणार आहे.