मुंबई
Amitabh Bachchan Kamal Haasan २०२४ मध्ये प्रदर्शित झालेल्या मल्टीस्टारर ‘Kalki 2898 AD’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर विक्रमी यश मिळवत जगभरात १,०४२ कोटी रुपयांची कमाई केली होती. भव्य स्टारकास्ट, अनोखे काल्पनिक विश्व आणि प्रभावी कथानकामुळे हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. चित्रपटाच्या प्रचंड यशानंतर निर्मात्यांनी त्याच्या सिक्वेलवर काम सुरू केले असून, शूटिंगला सुरुवात झाल्याची अधिकृत माहिती समोर आली आहे.
सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ब्लॉगद्वारे या सिक्वेलच्या शूटिंगबाबत खुलासा केला. दर रविवारी चाहत्यांना भेटण्याची परंपरा जपणारे बिग बी यावेळी मुंबईतील त्यांच्या निवासस्थानाबाहेर जमलेल्या चाहत्यांना भेटू शकले नाहीत. कामानिमित्त ते हैदराबादमध्ये सिक्वेलच्या चित्रीकरणात व्यस्त असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. घराबाहेर वाट पाहणाऱ्या चाहत्यांचे छायाचित्र शेअर करत त्यांनी यापूर्वीच अनुपस्थितीबाबत सूचना दिल्याचे नमूद केले.बिग बी यांनी चित्रपटाच्या सेटवरील काही पडद्यामागील छायाचित्रेही शेअर केली. यात त्यांनी साकारलेल्या अश्वत्थामाच्या भूमिकेतील त्यांचा लूक पुन्हा एकदा पाहायला मिळाला. विशेष म्हणजे, एका छायाचित्रात ते ज्येष्ठ अभिनेते कमल हासन यांना मिठी मारताना दिसत आहेत. ‘Geraftaar’नंतर जवळपास तीन दशकांनी ही जोडी पुन्हा मोठ्या पडद्यावर एकत्र झळकणार आहे. यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता अधिकच वाढली आहे.
पहिल्या भागात Amitabh Bachchan Kamal Haasan अमिताभ बच्चन यांनी साकारलेल्या अश्वत्थामाच्या भूमिकेचे प्रचंड कौतुक झाले होते. अनेक समीक्षकांनी त्यांच्या अभिनयाला चित्रपटाचा गाभा म्हटले होते. चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणाऱ्या प्रभास यांच्यापेक्षाही बिग बी यांची छाप अधिक प्रभावी ठरल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले होते. पहिल्या भागात कमल हासन आणि अमिताभ बच्चन यांनी एकत्र दृश्ये शेअर केली नव्हती; मात्र सिक्वेलमध्ये त्यांच्या पात्रांमधील संघर्ष आणि नातेसंबंध अधिक ठळकपणे मांडले जाणार असल्याचे समजते.दिग्दर्शक नाग अश्विन यांच्या मते, दुसऱ्या भागात कर्ण आणि अश्वत्थामाच्या व्यक्तिरेखांवर अधिक लक्ष केंद्रित केले जाईल. प्रभासचा स्क्रीन टाइमही वाढवण्यात येणार आहे. पहिल्या भागात महत्त्वाची भूमिका साकारणाऱ्या दीपिका पदुकोण या सिक्वेलचा भाग नसल्याच्या चर्चा रंगल्या असल्या, तरी याबाबत अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही.‘कलकी २८९८ एडी’ने विज्ञान-काल्पनिक शैलीत भारतीय पौराणिक घटकांची सांगड घालत प्रेक्षकांना नवे विश्व अनुभवायला दिले. आता सिक्वेलच्या चित्रीकरणाला सुरुवात झाल्याने चित्रपटसृष्टीत पुन्हा एकदा उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रेक्षकांना या भव्य प्रकल्पाची पहिली झलक कधी पाहायला मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.