मुंबई,
Mumbai Ratol poisoning case नफ्यासाठी मानवी आरोग्याशी खेळण्याचा संतापजनक प्रकार मुंबईतील मालाड परिसरात उघडकीस आला आहे. एका फळ विक्रेत्याने उंदीरांपासून फळांचे संरक्षण करण्याच्या नावाखाली फळांच्या सालीवर उंदीर मारण्याचे औषध लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मालाडमधील गजबजलेल्या भागात हा परप्रांतीय विक्रेता फळांची गाडी लावत होता. रात्रीच्या वेळी उंदीर फळे कुरतडून नुकसान करत असल्याने आर्थिक तोटा होत असल्याचा त्याचा दावा आहे. हे नुकसान टाळण्यासाठी त्याने सफरचंद आणि डाळिंब यांसारख्या महागड्या फळांच्या सालीवर ‘Ratol’ हे उंदीर मारण्याचे औषध लावल्याची कबुली दिल्याचे सांगितले जात आहे.स्थानिक नागरिकांनी संबंधित विक्रेत्याला फळांवर पिवळसर-काळपट रंगाचे क्रीम लावताना रंगेहाथ पकडले. सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली; मात्र चौकशीत त्याने उंदीर फळे खाऊ नयेत म्हणून हे कृत्य केल्याचे मान्य केले. या घटनेचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर शेअर होत असून, उघड्यावर विकल्या जाणाऱ्या फळांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.नागरिकांनी संबंधित विक्रेत्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. तसेच अन्न व औषध प्रशासनाने (FDA) या भागातील सर्व फळविक्रेत्यांची तातडीने तपासणी करावी, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे. सार्वजनिक आरोग्याशी संबंधित हा गंभीर प्रकार असल्याने प्रशासनाने कठोर कारवाई करावी, अशी भावना व्यक्त केली जात आहे.तज्ज्ञांच्या मते, Mumbai Ratol poisoning case, ‘रॅटोल’मध्ये ‘यलो फॉस्फरस’ Yellow Phosphorus हे अत्यंत घातक रसायन असते. हे विष शरीरात गेल्यास रक्तप्रवाहात मिसळून यकृत आणि मूत्रपिंडांवर गंभीर परिणाम करू शकते. फळांच्या सालीवर लावलेले असे रसायन पूर्णपणे धुवून निघेलच, याची खात्री नसते. विशेषतः लहान मुले फळे न सोलता किंवा अर्धवट धुवून खात असल्यास त्यांना अधिक धोका संभवतो.
या पार्श्वभूमीवर नागरिकांनी बाजारातून फळे खरेदी केल्यानंतर ती किमान १५ ते २० मिनिटे कोमट पाण्यात मीठ टाकून भिजत ठेवावीत आणि शक्य असल्यास साली काढूनच सेवन करावे, असा सल्ला तज्ज्ञांकडून देण्यात येत आहे. दरम्यान, या प्रकरणात प्रशासन काय कारवाई करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.