वेध
गिरीश शेरेकर
Mephedrone मेफेड्रॉन (एमडी) हे नशा करणार्या अमली नाव आता घरोघरी पोहोचले आहे. एमडीच्या विक्रीचा धंदा चांगलाच फोफावला आहे. त्यासाठी नागपूर-अमरावती हा रस्ता कॉरिडॉर म्हणून वापरला जात आहे. याच मार्गावरच्या कारंजा घाडगे येथे काही दिवसांपूर्वी महसूल गुप्तचर संचालनालयाच्या पथकाला एमडी तयार करण्याचा कारखानाच सापडला होता. येथे १२८ किलो मेफेड्रॉन जप्त करण्यात आले होते. या कारखान्यातला माल नागपूर अमरावती मार्गे राज्याच्या अन्य भागात पोहोचविला जात होता. सदर दोन्ही शहरे एमडी तस्करीची प्रमुख केंद्र झाली आहेत. येथूनच अन्य जिल्ह्यांमध्ये एमडी पोहोचविली जाते. अन्य राज्यातही या तस्करांचे नेटवर्क आहे. याच महिन्याच्या पहिल्या आठवड्यात महसूल गुप्तचर संचालनालयाने अमरावती शहरातही छापा टाकला होता. ५ किलो एमडी सदर पथकाने जप्त करून काही ताब्यात घेतले होते. या कारवाईसाठीची आवश्यक माहिती कारंजा प्रकरणातील तपासातून मिळाली होती. कारंजातून कुठे आणि कोणाकडे माल जात होता, याची संपूर्ण माहिती यंत्रणेला मिळाली आहे. त्या आधारावरच त्याचा तपास सुरू आहे. कारंजा व अमरावतीच्या या दोन मोठ्या कारवायांमुळे एमडी तस्करांच्या मनसुब्यांना धक्का बसला; पण जाळे मात्र उद्ध्वस्त झालेले नाही. शहरासह अन्य शहरांमध्येही सलग एमडी जप्त करण्याच्या होत असलेल्या कारवाई, त्याचे द्योतकच मानावे लागेल.
नागपूर-अमरावती मार्गावरून अतिशय बेमालूमपणे Mephedrone एमडीची वाहतूक होते. पण, एकदाही या मार्गावर कारवाई झालेली नाही. राज्यातल्या मुंबई, पुणे या मोठ्या शहरांमध्ये पसरलेले एमडीसह अन्य प्रकारच्या मादक ड्रग्सचे लोण आता छोट्या शहरांमध्येही पसरायला लागले आहे. ड्रग्सच्या या तरुण-तरुणी मोठ्या प्रमाणात अडकत असल्याचे वास्तव आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये झालेल्या अनेक कारवायांमधून ते स्पष्ट झाले आहे. एमडीचे सेवन करणार्यांची संख्या वाढते आहे. दोन वर्षांपूर्वी अमरावतीत एक कारवाई झाली होती; त्यावेळी झालेल्या तपासात अमरावतीत येणारे ड्रग्स हे मुंबईतून येत असल्याचे समोर आले होते. या धंद्यात एक मोठे रॅकेट सक्रिय मुंबई त्याचे मुख्यालय असले, तरी धंद्याच्या दृष्टीने आणि धोके टाळण्यासाठी विदर्भातले नागपूर व अमरावती हे त्याचे विभागीय केंद्र झाले आहे. एमडीच्या धंद्यात दोन साखळ्या तयार झाल्या आहेत. एक व्यवसाय करणार्यांची तर दुसरी साखळी शौकिनांची आहे. प्रत्येक शहरात अशा दोन साखळ्या आहेत. असंख्य तरुण या दोन्ही साखळीच्या कड्या होत आहेत. महाविद्यालयीन उच्च शिक्षण घेणार्या तरुणांचे (यात मुलींचाही समावेश आहे) प्रमाण सर्वाधिक आहे. मोठ्या शहरांमधला हा शौक आता छोट्या शहरांमध्ये फोफावल्यामुळे तो सर्वात मोठा चिंतेचा विषय आहे. त्यातून अनेक समस्या निर्माण होत असून गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत आहे. नशेचे अनेक प्रकार आहेत. अफू व त्यापासून तयार केलेले मॉर्फिन, हेरॉईन इत्यादी तर भांग, गांजा, चरस, ब्राऊन शुगर तसेच स्पिरीटचाही नशेसाठी उपयोग होतो. अतिशौकीन लोक सिंथेटिक अमली पदार्थ आणि आता घातक जीवघेणा एमडीचा (मेफेड्रॉन) वापर करतात. मॉर्फिन, हेरॉईन, कोकेन, चरस, ब्राऊन शुगर याची नशा महागडी असून त्या खालोखाल एमडीचा नंबर लागतो. त्याकडे तरुणांचा कल वाढत आहे. एमडीची खरेदी-विक्री सांकेतिक भाषेत होते, हे एमडीसह अन्य नशेली ड्रग्सच्या व्यसनामुळे अनेक तरुणांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले आणि काहींचे होण्याच्या मार्गावर आहेत.
त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. सुरुवातीला आवाक्यात असणारी ही नशा केव्हा अनियंत्रित होते, हे घेणार्यालाही कळत नाही. हा शौक जीवघेणा आहे. Mephedrone एमडीची ही समस्या हळूहळू व्यापक स्वरूप घेत आहे. सरकार, यंत्रणेला त्याकडे विशेष लक्ष द्यावे लागणार आहे. प्रत्येक शहरातले ड्रग्सचे शौकीन आणि त्यांना ड्रग्स पोहोचविणार्यांची साखळी शोधून ती खंडीत करावी लागेल. मोठ्या शहरांमध्ये बसलेले तस्करही शोधावे लागतील. त्यांचे तस्करीच्या अनुषंगाने असलेले अन्य कनेक्शन ब्रेक करावे लागतील. हजारो कोटींच्या उलाढालीच्या या धंद्याची पाळेमुळे खूप खोलवर रुजली आहेत. पोलिसांच्या मर्यादा लक्षात महसूल गुप्तचर संचालनालयाने त्यात डोके घातले आहे. त्यांनाही एका क्षणात सर्व शोधून नष्ट करणे शक्य नाही. एक मोठे अभियान त्यासाठी हाती घ्यावे लागणार आहे. प्रबळ इच्छाशक्तीशिवाय ते शक्य नाही. सरकार आणि प्रशासकीय यंत्रणेकडूनच सर्वांना अपेक्षा आहे.
९४२०७२१२२५