पेंचमधले गिधाड पोहोचले अंजनगावच्या लखाडमध्ये

25 Feb 2026 21:38:01
अंजनगाव सुर्जी,
pench-gidhad : तालुक्यातील लखाड परिसरात २४ फेब्रुवारी रोजी नामशेष होत चाललेल्या एका दुर्मिळ गिधाड पक्षाचे दर्शन झाल्याने परिसरात एकच आश्चर्य आणि कुतूहल व्यक्त केले जात आहे. विशेष म्हणजे, या गिधाडाच्या शरीरावर जीपीएस यंत्रणा आणि पायात एक ’युनिक कोड’ असलेली पट्टी आढळून आली असून हा पक्षी पेंच व्याघ्र प्रकल्पातील संरक्षण केंद्राचा असल्याचे स्पष्ट झाले आहे.
 
 

J
 
 
 
लखाड येथील शिवारात एका झाडावर हा अजस्त्र गिधाड पक्षी स्थानिक नागरिकांना बसलेला दिसला. काही वेळाने तो पक्षी अन्नाच्या शोधात खाली असलेल्या पाण्याच्या साठ्याजवळ आला. परिसरात गिधाड दिसल्याची बातमी वार्‍यासारखी पसरली आणि नागरिकांनी त्याला पाहण्यासाठी गर्दी केली. गिधाडाच्या शरीरावरील यंत्रे पाहून नागरिकांनी तातडीने याची माहिती वनविभागाला दिली.
 
 
//पेंच ते लखाड असा प्रवास
 
 
माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. प्राथमिक तपासणीत असे समोर आले की, हा पक्षी पेंच वन्यजीव प्रकल्पातील गिधाड संवर्धन केंद्रातून सोडण्यात आला होता. जीपीएस ट्रॅकरमुळे पेंच येथील अधिकार्‍यांना त्याच्या हालचालींची आधीच माहिती होती. अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, या गिधाडाने पेंच येथून प्रवास सुरू केला होता. नरखेड आणि अकोला मार्गे तो अकोट परिसरात पोहोचला. मात्र, परिसरात अन्नाची कमतरता भासल्याने भूकेमुळे तो लखाड येथील झाडावर स्थिरावला होता.
 
 
//आरोग्य तपासणीत गिधाड ’फिट’
 
 
परतवाडा येथील वन्यजीव प्राणी दवाखान्याचे डॉ. चंद्रकांत धंदर यांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून गिधाडाची सखोल वैद्यकीय तपासणी केली. तपासणीअंती हा पक्षी पूर्णपणे स्वस्थ असल्याचे त्यांनी घोषित केले. केवळ अन्नाच्या शोधात भटकंती झाल्याने त्याला काहीसा थकवा जाणवत होता. वनपरिक्षेत्र अधिकारी दिनेश वाळके यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभागाच्या पथकाने तातडीने लखाड गाठले. यावेळी वर्तुळ अधिकारी सुधीर हाते, वनरक्षक अंकिता मुंडे व त्यांच्या पथकाने गिधाडाचा रितसर पंचनामा केला आणि पेंच येथील नियंत्रण कक्षाला याची माहिती दिली.
 
 
//गिधाडांच्या मुळावर उठलेले औषध
 
 
याप्रसंगी गिधाड नामशेष होण्यामागचे प्रमुख कारणही चर्चेत आले. पूर्वी जनावरांना वेदनाशामक म्हणून दिल्या जाणार्‍या ’डायक्लोफेनाक सोडियम’ या औषधामुळे गिधाडांची संख्या झपाट्याने घटली होती. या औषधोपचार केलेल्या जनावरांचे मांस खाल्ल्याने गिधाडांचे मूत्रपिंड निकामी होऊन त्यांचा मृत्यू होत असे. याच कारणामुळे गिधाडे नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याने आता पेंच सारख्या केंद्रातून त्यांचे कृत्रिम प्रजनन करून संवर्धन केले जात आहे. सध्या या गिधाडावर वनविभागाची चमू लक्ष ठेवून असून, तो पुन्हा उड्डाण करण्यास सक्षम झाल्यावर त्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्याबाबत हालचाली सुरू आहेत
Powered By Sangraha 9.0