तभा वृत्तसेवा
आर्णी,
pratibha-dhanorkar : आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या रणधुमाळीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने आर्णीत जोरदार शड्डू ठोकला आहे. येथील राज पॅलेसमध्ये आयोजित भव्य कार्यकर्ता मेळाव्यास कार्यकर्त्यांचा अफाट प्रतिसाद मिळाला.
या मेळाव्यात बोलताना चंद्रपूर वणी आर्णी लोकसभेच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांनी महायुती सरकारवर कडाडून प्रहार केला. नगर पालिकांप्रमाणेच आता जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा परिवर्तन घडवून आणा, असे आवाहन करत त्यांनी आगामी निवडणुका जिंकायच्याच, असा निर्धार व्यक्त केला.
याच दरम्यान युवक काँग्रेसच्या नवनियुक्त पदाधिकाèयांना नियुक्तीपत्र देऊन त्यांच्यावर जबाबदाèया देण्यात आल्या. याच दरम्यान आपल्या भाषणात खा. धानोरकर यांनी सरकारवर जहरी टीका करताना एक महत्त्वाचा आरोप केला.
त्या म्हणाल्या की, राज्यात महायुती सरकारच्या विरोधात जनक्षोभ असून पराभवाचे स्पष्ट चित्र समोर दिसत आहे. याच पराभवाच्या धास्तीने भाजपा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका जाणीवपूर्वक समोर ढकलत आहे. लोकशाहीचा गळा आवळून जनतेचा कौल घेण्यास हे सरकार घाबरत असल्याचे त्या म्हणाल्या.
त्या पुढे म्हणाल्या, लाडकी बहीण योजना चालू करून महिलांना आकर्षित करण्याचा प्रयत्न झाला, मात्र गेल्या अनेक महिन्यांपासून महिलांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम भाजपा आणि महायुती सरकार करत आहे. केवळ निवडणुका तोंडावर आल्यावरच देवेंद्र फडणवीस सरकारला कर्जमाफीच्या चर्चांची आठवण झाली आहे. सरकारच्या फसव्या आश्वासनांवर आणि ध्येयधोरणांवर त्यांनी यावेळी कडक शब्दांत ताशेरे ओढले.
या मेळाव्यास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष आरिज बेग, जिल्हा बँकेचे माजी संचालक राजू गावंडे, माजी जिल्हा परिषद सदस्य स्वाती येंडे, बाजार समिती सभापती अनिल आडे, माजी सभापती राजू विरखेडे, बाळासाहेब शिंदे, बाळासाहेब गिरी, परसराम राठोड यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रत्येक बुथवर काँग्रेसची ताकद वाढवून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये जनसामान्यांचे सरकार आणण्याचा संकल्प यावेळी सर्वांनी केला. या प्रसंगी प्रकाश वानखडे, साहिद रयानी, तालुका अध्यक्ष नरेश राठोड, सुनंदा बोक्से, विजय राऊत, नगरसेवक अमोल मांगुळकर, अमित राठोड, विजय मोघे, सुनील भारती, राहुल देवतळे, नितीन खोडे, वसंत जगताप, देवराव मसराम, विष्णू लोणकर, अतुल देशमुख, विनोद पंचभाई, विजय देवतळे, संजय राऊत यांच्यासह तालुक्यातील असंख्य निष्ठावंत पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.