पुलगाव ग्रामीण रुग्णालयाला आरोग्यरत्न पुरस्कार

25 Feb 2026 19:49:59
पुलगाव, 
pulgaon-rural-hospital : पुलगाव ग्रामीण रुग्णालयातील अधिकारी व कर्मचार्‍यांच्या कार्याची दखल घेत राज्य शासनाच्यावतीने या ग्रामीण रुग्णालयाला वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्यरत्न पुरस्कार जाहीर झाला असून हा पुरस्कार नुकताच मुंबई येथे पार पडलेल्या कार्यक्रमात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुमंत वाघ यांच्या मार्गदर्शनात वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रमोद कोडापे यांनी स्विकारला. सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला.
 
 
 
g
 
 
 
रुग्णालयातील बोर, ओपीडी, आयपीडी, मोठी शस्त्रक्रीया, मध्यम शस्त्रक्रीया, नॉर्मल डिलीव्हरी, या सारख्या निर्देशांकाचे मूल्यमापन करून उत्कृष्ट रुग्णालयाची निवड करणे आणि महाराष्ट्र राज्यातील आरोग्य सुविधा पुरविण्याच्या बाबतीत चांगली कामगिरी करणार्‍या उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण व महिला रुग्णालयांचा सन्मान करण्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक तसेच महिला रुग्णालय, १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय, ५० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालयांची निवड करण्यात आली होती. या स्पर्धेत पुलगाव येथील ग्रामीण रुग्णालयाने २१ पैकी १४ गुण प्राप्त केले. ३० खाटांच्या या रुग्णालयाने स्पर्धा काळात मोतिबिंदू मुत वर्धा जिल्हा या उपक्रमात जिल्ह्यात उल्लेखनीय कामगिरी केली. तसेच ५० हून अधिक प्रसुती, १२० हून अधिक जटील शस्त्रक्रिया, १८ हजारांहून अधिक रुग्णांना ओपीडी तर २ हजाराहून अधिक रुग्णांना आयपीडी सेवेचा लाभ दिला. या कार्याची दखल शासनाने घेऊन पुलगावच्या ग्रामीण रुग्णालयाला राज्यस्तरीय वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्यरत्न पुरस्कारने गौरविले आहे.
 
 
पुलगाव येथील ग्रामीण रुग्णालयातील डॉटर व इतर कर्मचार्‍यांवर पुलगाव व परिसरातील गावांमधील नागरिकांचा मोठा विश्वास आहे. या रुग्णालयातील ओपीडी सेवेचा दररोज किमान ५००हून अधिक रुग्ण लाभ घेतात. एकूणच पुलगाव येथील ग्रामीण रुग्णालय गरीब व गरजुंसाठी फायद्याचेच ठरत आहे.
Powered By Sangraha 9.0