बाळ चोरीची अफवा अन् उडाला गोंधळ !

25 Feb 2026 19:37:41
गोंदिया, 
rumors-of-child-theft : सद्या गोंदिया-भंडारा जिल्ह्यात बाळ विक्रीचे प्रकरण गाजत असताना आता गोंदिया जिल्ह्यात बाळ चोरी करणारी टोळी सक्रीय झाल्याची अफवा पसरली असून या अफवेतून एका मनोरुग्ण महिलेला गावकर्‍यांनी रोखून धरत गोंधळ घातल्याची घटना गोंदियाच्या कटंगी येथे मंगळवारी रात्री ७.३० ते ८ वाजताच्या सुमारास घडली. दरम्यान, पोलिसांनी वेळीच घटनास्थळ गाठून सदर महिलेची नागरिकांच्या तावडीतून सुटका केली. या घटनेचे व्हिडीओ आता समाज माध्यमांवर व्हायरल झाले असून अशा प्रकारची कोणतीही अफवा पसरवू नये असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
 
 
 
kl
 
 
 
जवळच्या भंडारा जिल्ह्यात बाळ विक्री प्रकरण उघडकीस आले असून भंडारा पोलिसांनी यातील मुख्य सुत्रधार गोंदिया येथील एका डॉक्टरासह ६ जणांना अटक केली आहे. हे प्रकरण सुरू असताना गोंदियाच्या ग्रामीण भागात बाळ चोरी करणारी टोळी सक्रीय झाल्याची अफवा पसरल्याचे दिसत आहे. या अफवेचे पडसाद मंगळवारी रात्रीच्या सुमारास शहराला लागून असलेल्या कटंगी गावात दिसून आले. गावात संशयीतरित्या फिरत असलेल्या एका महिलेला बाळ चोरी करणारी असल्याचे समजून गावकर्‍यांनी रोखून धरत एकच गोंधळ केला. ही बातमी परिसरात पसरताच नागरिकांनी एकच गर्दी केली. घटनेची माहिती ११२ क्रमांकावर देण्यात आली. यावर रामनगर पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत त्वरीत घटनास्थळ गाठून प्रकरण जाणून घेतले. यावेळी सदर महिला ही मनोरुग्ण असून तिला आपले नाव व पत्ता देखील सांगता येत नसल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी गावकर्‍यांची समजूत काढून सदर महिलेला गावकर्‍यांच्या तावडीतून सोडवले व तिच्या कुटूंबीयांची माहिती घेऊन त्यांच्या स्वाधिन केले. पोलिसांनी समयसुचकता दाखवल्यामुळे मोठा अनर्थ टळला. मात्र, या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ आता समाज माध्यमावर व्हायरल झाला असून नागरिकांनी अशा अफवांना बळी न पडता सत्यता जाणून घ्यावी. त्याचबरोबर अशा अफवा पसरवू नये असे आवाहन पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
 
 
सदर महिला मनोरुग्ण असून तिला तिच्या कुटूंबीयांच्या स्वाधिन करण्यात आले आहे. बाळ चोरीसारखे प्रकार घडत असल्यास ११२ वर माहिती देणे अपेक्षीत आहे. मात्र, विनाकारण अशा अफवा पसरवू नये, अफवा पसरवणार्‍यांच्या विरोधात वरीष्ठांच्या आदेशनुसार गुन्हा दाखल करण्यात येईल,
- संजय नागरगोजे
पोलिस उपनिरिक्षक, रामनगर
Powered By Sangraha 9.0