हिंगणघाट,
Sameer Kunawar MLA, हिंगणघाट विधानसभा क्षेत्राचे आमदार समीर कुणावार यांनी २४ रोजी विधानसभा अधिवेशनात कॅन्सर रुग्णांचा प्रश्न प्रकर्षाने मांडला. कॅन्सर पीडित रुग्णांच्या उपचारासाठी नागपूर येथे राष्ट्रसंत तुकडोजी कॅन्सर रुग्णालय आहे, परंतु सदर रुग्णालयामध्ये कॅन्सरच्या रुग्णांची वाढती संख्या पाहता गरीब व गरजूंना तपासणीसाठी एक ते दीड महिन्यापर्यंत कालावधी दिल्या जातो. किमोसारख्या उपचाराकरिता एवढा वेळ दिला जात असल्याने रोगी कॅन्सरच्या तिसर्या किंवा चौथ्या स्टेजमध्ये जात असल्याची गंभीर बाब आ. समीर कुणावार यांनी सभागृहात मांडली.
या संबंधात राज्य शासनाने कॅन्सर रुग्णांच्या वेटिंगच्या प्रश्नाबद्दल कॅन्सर निदान झालेल्या रुग्णांच्या किमोकरिता निधी अपुरा पडत असल्याची बाब मांडली. हा निधी एक-दोन किमो मध्येच खर्च होतो. त्यामुळे पुढील उपचाराकरिता त्या रुग्णांसमोर आर्थिक प्रश्न उभा राहतो. या संबंधात शासनाने तातडीने दखल घ्यावी, अशी मागणी आमदार कुणावार यांनी सभागृहात केली आहे. यावर सभागृहात उत्तर देताना राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी आ. कुणावार यांनी उपस्थित केलेला मुद्दा गंभीर असल्याचे मान्य केले. तसेच या संबंधात राज्य शासनाला लवकरात लवकर धोरणात्मक निर्णय घेऊन कॅन्सर रुग्णांसाठी उपाय योजना करावी लागेल, असे सांगितले. शासनाने नागपूरच्या इतर कॅन्सर रुग्णालयामध्ये सुद्धा सामान्य कॅन्सर रुग्णांसाठी सुविधा केली आहे. किमोच्या खर्चामध्ये वाढ करण्यासाठी धोरणात्मक निर्णयाची गरज असल्याचे मंत्री आबिटकर यांनी सभागृहात सांगितले.
एम. आर. वाय. जी. अंतर्गत Sameer Kunawar MLA, निधी कमी पडणार्या रुग्णांना दिलासा देण्याचा राज्य शासनाचा मानस आहे. त्यासाठी लवकरात लवकर धोरणात्मक निर्णय घेऊन तात्काळ पाऊल उचलू, असे आ. कुणावार यांच्या लक्षवेधी प्रश्नावर उत्तर देताना सार्वजनिक आरोग्य मंत्री आबिटकर म्हणाले. तसेच गरीब व गरजू कॅन्सरग्रस्त रुग्णांना जिल्हा तसेच तालुकास्तरावर कॅन्सर उपचार व निदान सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन प्रयत्नशील असून यासंदर्भात लवकरच निर्णय घेतला जाईल, असेही ना. आबिटकर यांनी सांगितले. आमदार समीर कुणावार यांच्या लक्षवेधीमुळे कॅन्सर पीडित रुग्णांना मोठा दिलासा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.