कारंजा लाड,
sanjay-deshmukh : सामाजिक बांधिलकी आणि विकासाच्या संकल्पनांनी ओतप्रोत भरलेला खासदार संजय देशमुख यांचा नागरी सत्कार सोहळा कारंजा येथील मुर्तीजापुर मार्गावरील रिद्धी सिद्धी मंगल कार्यालयात नुकताच पार पडला. या सत्काराला उत्तर देताना आयोजित कार्यक्रमात बोलताना खासदार संजय देशमुख यांनी कारंजात हळद प्रक्रिया प्रकल्प सुरू करणार असल्याची ग्वाही दिली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच गणेशपुरे कुटुंबाचे आधारस्तंभ स्व. अनिल पाटील गणेशपुरे यांच्या प्रतिमांचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.त्यानंतर खासदार संजय देशमुख यांचा नागरी सत्कार करण्यात आला. वाढदिवसानिमित्त ज्योती गणेशपुरे यांचेवर देखील सर्व मान्यवर, महाविकास आघाडीचे पदाधिकारी, मित्रपरिवार व नातेवाईकांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. यावेळी बोलताना आपल्या मनोगतात ज्योती गणेशपुरे यांनी कारंजा तालुयातील बेरोजगार युवकांना स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध व्हावा, तसेच मोठे उद्योग प्रकल्प उभे राहावेत, अशी ठाम मागणी केली.
त्यावर तत्काळ प्रतिसाद देत खासदार देशमुख यांनी उद्योग पुढे पाहू परंतु कारंजात हळदीचा मोठा प्रक्रिया प्रकल्प मंजूर करून आणण्यासाठी मी प्रयत्नशील राहीन.असे प्रतिपादन केले. या प्रकल्पामुळे शेतकर्यांना हळद पिकासाठी हमखास बाजारपेठ उपलब्ध होईल, ओल्या हळदीवर थेट प्रक्रिया करून पावडर निर्मिती होणार असल्याने उत्पादन खर्चात बचत होईल आणि युवकांना स्थानिक स्तरावर रोजगाराची संधी निर्माण होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजाभाऊ डोणगांवकर होते.तर व्यासपीठावर खासदार संजय देशमुख, ज्योती गणेशपुरे, जि.म. बँकेचे उपाध्यक्ष श्रीधर पाटील कानकिरड, माजी जि.प. अध्यक्ष अरविंद पाटील इंगोले, माजी समाजकल्याण सभापती जयकिसन राठोड, माजी नगराध्यक्ष अरविंद लाठीया, दत्ता पाटील तुरक, डॉ. पंकज काटोले, विविध पक्षांचे तालुकाध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते. सूत्रसंचालन काँग्रेस तालुकाध्यक्ष विजय देशमुख यांनी केले. प्रस्ताविक बाळू पाटील कडू यांनी तर आभार प्रदर्शन अनिल म्हस्के यांनी केले. कार्यक्रमाला तालुयातील नागरिकांची लक्षणीय उपस्थिती होती.