बुलढाणा,
sanjay-gaikwad : नगरपरिषद बुलढाणा येथील सार्वत्रिक निवडणुकीनंतर नवनिर्वाचित कार्यकारीणीने थकीत रकमेची सक्तीने वसुली सुरू केल्याने शहरालगतच्या काही ग्रामपंचायतींचा पाणी पुरवठा खंडीत करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर आ. संजय गायकवाड यांच्या हस्तक्षेपामुळे सावळा, सुंदरखेड व सागवान ग्रामपंचायतींचा पाणीपुरवठा पुन्हा सुरळीत करण्यात आला आहे.
बुलढाणा नगरपरिषद शहराला लागून असलेल्या काही ग्रामपंचायतींना पाणीपुरवठा करते तसेच नगरपालिकेच्या डम्पिंग ग्राउंडवर त्या ग्रामपंचायतींना कचरा टाकण्याची परवानगी दिली जाते. मात्र मागील अनेक वर्षांपासून नगरपालिकेच्या पाणीपुरवठ्याची बिले संबंधित ग्रामपंचायतींकडे थकीत असल्याने थकीत रक्कम भरा अन्यथा पाणीपुरवठा खंडीत केला जाईल, अशी तंबी देत नगरपालिकेने पाणीपुरवठा बंद केला होता. थकीत रकमेचा तातडीने भरणा करण्यास ग्रामपंचायती सक्षम नसल्याने पाणीपुरवठा बंद करण्यात आला होता.
यावेळी सागवान ग्रामपंचायतीचे सरपंच देवानंद दांडगे यांनी आ. संजय गायकवाड यांची भेट घेतली. आमदारांच्या भेटीनंतर सरपंचांनी पाणीपुरवठा व कचरा गाड्या सुरळीत सुरू ठेवण्याची विनंती केली. तसेच ३१ मार्चपर्यंत नगरपालिकेची थकीत रक्कम भरून देण्याचे आश्वासन दिले. या मागणीची दखल घेत आ. संजय गायकवाड यांनी नगरपालिकेला निर्देश दिले की, शहरालगतच्या ग्रामपंचायतींचा पाणीपुरवठा तात्काळ सुरळीत करण्यात यावा. तसेच नवीन डम्पिंग ग्राउंड सुरू होईपर्यंत सध्याच्या डम्पिंग ग्राउंडवर संबंधित ग्रामपंचायतींना कचरा टाकण्यास परवानगी द्यावी. आ. संजय गायकवाड यांच्या या सकारात्मक हस्तक्षेपामुळे सावळा, सुंदरखेड व सागवान ग्रा.पं. मधील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून, शहरालगतच्या ग्रामपंचायतींचा प्रलंबित पाणी पुरवठ्याचा प्रश्न मार्गी लागला असून सरपंचांनी आ. गायकवाड यांचे आभार व्यक्त केले.